- राजू नायकगोव्यात भाजपात घमासान सुरू आहे. मनोहर पर्रीकर व पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी आणि संघाने खतपाणी घालून वाढविलेला हा पक्ष विघटनाच्या मार्गावर तर उभा नाही ना, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित झाला आहे.भाजपाचे १३ आमदार २०१७च्या विधानसभा निवडणुकीत जिंकून आले. त्यात सर्वाधिक सात जण ख्रिस्ती होते. ख्रिस्ती चर्च या वेळी भाजपाबरोबर नव्हती. तरीही या ख्रिस्ती उमेदवारांना जनतेची पसंती मिळाली. सध्या त्यांच्यात चलबिचल सुरू आहे; कारण मोदी-शहांची राजवट अल्पसंख्याकांना मान्य नाही. दुस-या बाजूला मनोहर पर्रीकर यांना अल्पसंख्याकांची असलेली सहानुभूती कमी झाली आहे. पर्रीकर आजारी असतानाही सत्तेला चिकटून आहेत, त्यामुळेही लोक नाराज आहेत.गेल्या आठवडय़ात पर्रीकरांनी दोघा आजारी मंत्र्यांना काढून दोन नवे मंत्री घेतले. त्यात एक जरी ख्रिस्ती आमदार असला तरी, त्यात मायकल लोबो यांचा समावेश ते करू शकले नाहीत. लोबो यांनी २०१७मध्ये गोव्यात भाजपाचे सरकार स्थापन होण्यासाठी प्रयत्न केले- आपल्याला डावलले गेल्याचा त्यांना राग आलाय, स्वाभाविकच त्यांनी पर्रीकरांवरच आगपाखड केलीय. ‘पर्रीकर यांचे आरोग्य एकदमच बिघडले आहे. त्यात कसलाही सुधार नाही,’ असे ते बोलले. भाजपाचा आमदार एवढे तिखट बोलण्याची ही पहिलीच वेळ.पर्रीकरांचा आजार गंभीर असल्यानेच विरोधकही कधी नव्हे ते टीकेचे सूर लावू लागलेत; परंतु भाजपाचे सदस्य, विशेषत: ख्रिस्ती आमदार टीका करू लागलेत याचा अर्थ ते कमालीचे अस्वस्थ आहेत आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्ष सोडून जाऊ शकतात. भाजपा गोव्यात पुन्हा सत्तेवर येऊ शकणार नाही, असे वाटले तर भाजपाला मोठेच खिंडार पडू शकते. मनोहर पर्रीकर यांच्याकडे कमकुवत उमेदवारांनाही जिंकून आणण्याची ताकद होती. ती संपली तर भाजपाच्या आश्रयाला कोण राहील?ज्या पद्धतीने गोवा फॉरवर्ड पक्ष स्थापन झाला, तसाच आणखी एक पक्ष तयार करावा किंवा गोवा फॉरवर्डमध्येच प्रवेश करावा, असे मनसुबे गोव्यात रचले जात आहेत. काँग्रेस पक्षातील असंतुष्ट बाबूश मोन्सेरात, ज्योकी-युरी आलेमाव पितापुत्रद्वयी वगैरेंनी यापूर्वीच गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश घेतला आहे. लोबो यांच्या अस्वस्थतेला ज्या पद्धतीने गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी पाठिंबा दिला आहे, तो पाहिला तर लोबो नजीकच्या काळात त्या पक्षाच्या आश्रयाला येऊन गोव्यात नवी राजकीय व्यूहरचना तयार करू शकतात, असे संकेत मिळतात.(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत.)
गोव्यात भाजपा विघटनाच्या वाटेवर!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2018 10:05 PM