पणजी : गोव्यातील भाजपला व सत्ताधारी आघाडीचा घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड व मगोपलाही आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या निर्णयाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. शहा यांच्याकडून गोवा सरकारच्या नेतृत्वाची धुरा कुणाकडे सोपविली जाईल याकडेच भाजपच्या कोअर टीमचे व गोवा फॉरवर्ड आणि मगोपचे लक्ष आहे. शहा यांचा तोडगा समाधानकारक निघाला नाही तर राजकीय क्षेत्रात व सत्ताधारी आघाडीच्या पातळीवर पुढील हालचाली सुरू होतील, अशी माहिती मिळते.
मगोपचे सुदिन ढवळीकर हे आम्हाला तात्पुरते मुख्यमंत्री म्हणून नको आहेत, अशी भूमिका गोवा फॉरवर्डचे नेते मंत्री विजय सरदेसाई यांनी घेतल्यानंतर भाजपवरील दबाव वाढला. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह अमित शहा यांनाही सरदेसाई यांच्या आक्षेपाची लगेच दखल घ्यावी लागली. शहा यांनी शनिवारी मंत्री सरदेसाई यांना फोन केला होता व आम्ही ढवळीकर यांच्याकडे सुत्रे सोपविण्याचा निर्णय घेतलेला नाही, तुम्ही तुमचे म्हणणे पक्षाच्या निरीक्षकांसमोर मांडा, असा सल्ला शहा यांनी सरदेसाई यांना दिला होता. शहा यांनी सांगितल्यानुसार लगेच रविवारी गोव्यात भाजपच्या तिघा निरीक्षकांना पाठवून दिले. याविषयी मंत्री सरदेसाई यांनी सोमवारी जाहीरपणे शहा यांना धन्यवादही दिले.
एकाबाजूने मंत्री सरदेसाई यांचा गोवा फॉरवर्ड पक्ष आणि दुसऱ्याबाजूने मंत्री ढवळीकर यांचा मगो पक्ष आहे. या दोन्ही पक्षांवर आणि तिघा अपक्षांवर भाजप सरकारचा डोलारा अवलंबून आहे. मुख्यमंत्री पर्रीकर व भाजपचे अन्य दोन मंत्री सध्या इस्पितळात आहेत. सरकारला ग्रहण लागल्यासारखी स्थिती आहे व तशात राजकीय अफवांना ऊत आलेला आहे. या सगळ्य़ा पार्श्र्वभूमीवर गोवा फॉरवर्ड, मगोप व भाजपच्या कोअर टीमनेही भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांसमोर स्वत:ची भूमिका मांडलेली आहे.
मुख्यमंत्री अत्यंत आजारी असताना नेतेपद कुणाकडे सोपवावे याबाबत भाजपमध्ये दोन गट आहेत. मात्र अमित शहा यांच्यावर गोव्यातील भाजपपेक्षा गोव्यातील गोवा फॉरवर्ड, मगोप आणि तिघा अपक्षांना समाधानी करण्याची जबाबदारी आलेली आहे. त्यामुळेच शहा कोणता निर्णय घेतात हे जाणून घेण्याची उत्सुकता गोवा फॉरवर्ड व मगोपला आहे.
आम्ही पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना आमचा अहवाल सादर करू, असे भाजपच्या निरीक्षकांनी गोव्याचा निरोप घेताना सांगितले आहे. निरीक्षक उद्या बुधवारपर्यंत अहवाल सादर करतील, असे भाजपच्या काही जबाबदार पदाधिकाऱ्यांनी अपेक्षित धरले आहे. गोव्यातील सरकार टीकावे व काँग्रेसला सत्तेवर येण्यास देऊ नये हेच शहा यांचे प्रमुख लक्ष्य आहे.