मडगाव - लाच प्रकरणी दोषी ठरलेल्या गोव्यातील कुंकळ्ळी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न भगत याला न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 7 कलम 13 (2),अंर्तगत 10 हजार रुपयांचा दंड तसेच कलम 13 (ब)खाली 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. संशयिताने या शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपिल करण्याचा अर्ज न्यायालयात सादर केल्यानंतर ही शिक्षा स्थगित करुन संबधित न्यायालयात दाद मागण्यासाठी त्याला एका महिन्याचा अवधी देण्यात आला.
सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता लादिस्लाव फर्नांडिस तर संशयितातर्फे वकील अमित पालेकर यांनी बाजू मांडली. दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीक्ष बी.पी. देशपांडे यांच्या न्यायालयाने हा निवाडा दिला. सोमवार 28 जानेवारी रोजी या न्यायालयाने संशयिताला दोषी ठरविले होते. काब द राम येथे सहलीसाठी गेले असता दोन युवकांना बुडून मृत्यू आला होता. मृत व्यक्तीसहीत गेलेल्या अन्य युवकांविरुद्ध गुन्हा नोंद करू अथवा एक लाख रुपये द्यावे, अशी मागणी भगत याने त्यांच्या पालकाकडे केली होती. मागाहून यासंबधी तक्रार नोंद झाल्यानंतर भगत याला सेवेतून निलंबित करण्यात आले होते.
सरकारपक्षातर्फे या खटल्यात एकूण एकवीस साक्षीदार तपासण्यात आले होते. 7 कलम 13 (2), कलम 13 (ब) भ्रष्ट्राचार प्रतिबंधात्मक कायद्याखाली न्यायालयाने त्याला दोषी ठरविले होते. 8 जुलै 2011 साली 11 जणांचा एक गट काब द राम येथे समुद्रकिनारी सहलीसाठी गेला होता. यावेळी झालेल्या दुर्घटनेत नोयल परेरा (17, फातोर्डा ) आणि सुनील रामचंद्रन (16, नावेली) या दोघांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. तर अजुम खान हा वाचला होता. कुंकळ्ळी पोलिसांनी या घटनेच्या तपास करुन नंतर एल्टन, मंदार, जोनाथन आणि अमर या मुलांना पोलीस ठाण्यात बोलावून नंतर घरी पाठवून दिले होते.
चौकशीच्या निमित्ताने वरील युवकांना पालकांसमवेत पोलीस ठाण्यात येण्यास बजाविले होते. भगत याने पुन्हा एकदा चौकशी केली आणि नंतर चारही युवकांच्या पालकांना आत बोलाविले. तुमच्या पाल्यांना खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करु,असे धमकाविले होते. एल्टन हा अल्पवयीन असल्याने त्याला मेरशी येथे अपना घरात पाठवून देऊ, असा दम भरला होता. त्यानंतर पुन्हा एकदा या युवकांच्या पालकांना आत बोलावून तुम्ही काय निर्णय घेतला आहे असे विचारले होते. या युवकांपैकी एका युवकाच्या वडिलांचा एक पोलीस शिपाई मित्र होता. तो त्याच पोलीस ठाण्यात कामाला होता. भगत याने पैशाची मागणी केली असता, एल्टनच्या वडिलाने 50 हजार देउ असे सांगितले होते. मात्र ही रक्कम कमी आहे असे सांगून एक लाख पाहिजे अशी मागणी भगत याने केली होती. नंतर भगत हा कार घेउन पैसे घेण्यासाठी कुंकळळी मार्केटमध्ये आला होता.
जेसन गोयस यांनी मागाहून मडगाव विभागाचे तत्कालीन पोलीस उप-अधीक्षक उमेश गावकर यांच्याकडे या लाच संबंधी लेखी तक्रार नोंदविली होती. कुंकळ्ळी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक नेल्सन आल्बुकर्क यांनी मागाहून आपला अहवाल सादर केल्यानंतर दक्षिण गोव्याचे तत्कालीन पोलीस अधिक्षक अॅलन डिसा यांनी भगत याला सेवेतून निलंबित केले होते. खात्याअंतर्गत चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याला पुन्हा सेवेत घेण्यात आले होते.