लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी गोवा: विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे पाचऐवजी आता केवळ चार दिवसांचेच ठेवण्यात आले आहे. दि. २७ ते ३१ मार्च असे हे अधिवेशन असून ३० मार्चला रामनवमीची सुट्टी असेल. सरकारने रामनवमीचे कारण देत अधिवेशन चार दिवसाचे केल्याने विरोधकांना आणि लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. विरोधकांनी सरकारवर कडक टीका केली आहे.
राज्यपालांनी २४ फेब्रुवारीला आदेश जारी करून दि. २७ ते ३१ मार्च यादरम्यान विधानसभा अधिवेशन बोलावले होते. परंतु शुक्रवारी नव्याने जारी केलेल्या आदेशात हे अधिवेशन केवळ ४ दिवसांचेच असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ३० मार्चला रामनवमीनिमित्त सुटी असल्यामुळे हा दिवस अधिवेशनातून वगळण्यात आला आहे.
अधिवेशनाचे दिवस कमी करण्याच्या निर्णयावर विरोधकांनी कठोर टीका केली आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विशेष पत्रकार परिषद घेऊन सरकारकडे विरोधकांना सामोरे जाण्याची हिंमत नसल्याचा आरोप केला आहे. रामनवमीनिमित्त सांगून अधिवेशनाचे दिवस कापण्याचे काम असमर्थनीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सर्व विरोधी आमदारांशी वैयक्तिकरित्या संपर्क साधून एकजुटीने सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती तयार केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. आमदार अॅड. कार्लोस आल्वारिस फरैरा व एल्टन डिकॉस्टाही यावेळी उपस्थित होते.
कसे मांडायचे प्रश्न
वेळापत्रकात बदल झाल्याने विविध खात्यांशी संबंधित प्रश्न मांडण्यावर बंधने आली आहेत. पहिल्या दिवशी १९ खाती, दुसया दिवशी १४ तिसऱ्या दिवशी १६ आणि चौथ्या दिवशी १३ खात्यांवर प्रश्न विचारावे लागतील, दररोज केवळ ३ तारांकीत प्रश्न विचारणे शक्य होत असल्यामुळे आमदारांना प्रश्न विचारण्यासाठी संधीच नसल्याचे ते म्हणाले.
कामकाजाचे राम नाम सत्य है।
सरकारने रामनवमीचेनिमित्त साधून एक दिवसांच्या कामकाजाचे राम नाम सत्य है' केले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे. सरकारमध्ये विरोधकांना तोंड देण्याची हिंमत नाही. ३० मार्चला रामनवमीची सुट्टी द्यावीच. परंतु सरकारने अधिवेशनाचा दिवस वाढवून कामकाजाचे वेळापत्रक का बदलले नाही? असा प्रश्न त्यांनी केला.
'मुँह में राम, बगल में छुरी'
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कार्यकाळ पाच दिवसांवरून चार दिवस करणे म्हणजे 'मुँह में राम बगल में छुरी', असा प्रकार असल्याची टीका आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे. रामनवमीची देशभरात सुट्टी असते. सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्यास घाबरत आहेत. यापूर्वी राम नवमीदिवशी विधानसभेचे अधिवेशन झालेले आहे तर अनेकवेळा अधिवेशनाचा कार्यकाळ एका दिवसाने वाढवलेला आहे. मग सरकार आताच रामनवमीचेनिमित करून अधिवेशनाचा कार्यकाळ कमी का करू पाहात आहे? असा प्रश्न सरदेसाई यांनी केला आहे.
अर्थसंकल्प : सूचना मागविल्या
- अर्थसंकल्प २०२३-२४ साठी सरकारने लोकांकडून सूचना मागविल्या आहेत.- या सूचना वेबपोर्ट लवर ऑनलाईन पद्धतीने देण्यास सांगितल्या आहेत. https://goaon- line.com.in/ या वेबपोर्टलवर सूचना सादर करण्याची सोय करण्यात आली आहे.
- कामकाजाचे दिवस काही सभापती ठरवित नसतो. जितके दिवस अधिवेशन होणार आहे, तितक्या दिवसांचे कामकाज ठरविण्याचे काम कामकाज सल्लागार समिती ठरविते. -रमेश तवडकर, सभापती, गोवा विधानसभा.
- श्रीराम आमच्याबरोबर एल्टन केपेचे आमदार एल्टन हे सरकारला टोला हाणताना म्हणाले, की श्रीराम हे आमच्याबरोबर आहेत. कारण रामनवमी गुरुवारी आहे. त्यामुळे शुक्रवारी खासगी सदस्यांच्या कामकाजाची संधी अजून शाबूत आहे. - एल्टन डिकोस्टा, आमदार, केपे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"