पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना अलिकडे अनेक मंत्री भेटलेले नाहीत, फोनवरही त्यांच्याशी बोललेले नाहीत. मुख्यमंत्री गेले काही महिने म्हणजे गणेश चतुर्थीच्या कालावधीपासून सचिवालय तथा मंत्रालयातही आलेले नाहीत. अशा परिस्थितीत मनोहर पर्रीकर अनेक महिन्यांच्या खंडानंतर आपल्या निवासस्थानी बुधवारी (1 नोव्हेंबर) मंत्रिमंडळाची बैठक घेत असल्यानं बहुतेक मंत्र्यांमध्ये उत्सुकता आहे.
पर्रीकर खूप आजारी आहेत. त्यामुळे ते घराबाहेर पडू शकत नाहीत. दिल्लीतील एम्स इस्पितळातून 14 ऑक्टोबरला त्यांना डिस्जार्च देण्यात आला. यानंतर ते थेट त्यांच्या निवासस्थानी आले. आजारपणामुळे गेले अनेक महिने ते मंत्रिमंडळाची बैठक घेऊ शकलेले नाहीत. अचानक त्यांनी दोनापावल- करंजाळे येथील आपल्या निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक बोलावल्याने मुख्यमंत्री आपल्याशी नेमके काय बोलणार व बैठकीत कोणता निर्णय होणार याविषयी मंत्र्यांमध्ये उत्सुकता आहे. पर्रीकर हे चारवेळा मुख्यमंत्री बनले पण आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या पूर्ण कारकीर्दीत पर्रीकर यांनी कधीच आपल्या खासगी निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक घेतलेली नाही. आता प्रथमच ते निवासस्थानी बैठक घेत आहेत, कारण त्यांना सचिवालयात किंवा मंत्रालयात येणे शक्य नाही याची जाणीव मंत्र्यांना आहे.
अनेक मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांशी सरकारी कामाविषयी बोलायचे आहे. आपल्या प्रस्तावांच्या फाईल्स सरकारी पातळीवर केवळ फिरत राहतात, लवकर मंजूर होऊन येत नाहीत किंवा अर्थ खात्याकडून आक्षेप घेऊनच प्रस्ताव वारंवार स्पष्टीकरणासाठी पाठविले जातात असेही काही मंत्र्यांचे म्हणणे आहे. लोक चहूबाजूने प्रशासनावर टीका करत आहेत. अशावेळी मुख्यमंत्री स्वत:कडील काही खाती अन्य मंत्र्यांकडे देतील काय व त्याविषयी ते बुधवारी आपल्याशी संवाद साधतील काय असाही प्रश्न काही मंत्र्यांना पडला आहे.
पर्रीकर यांना कोणता आजार झाला आहे याविषयी सरकारी पातळीवरून कधीच अधिकृतरित्या सांगितले गेले नव्हते. आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी र्पीकर यांना स्वादुपिंडाचा कॅन्सर झाला. असल्याचे दोन दिवसांपूर्वी जाहीर केले व पर्रीकर यांनी त्यांच्या कुटुंबासोबत विश्रांती घ्यायला हवी असे मत मांडले. राणे हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जातात. साखळीचे आमदार प्रमोद सावंत हेही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचे मानले जाते. या सगळ्या स्थितीत पर्रीकर मंत्रिमंडळाच्या बैठकीवेळी नेमके कोणते प्रस्ताव मंजूर करतील हे अजून काही मंत्र्यांना कळालेले नाही. आपल्याकडील अतिरिक्त खाती आपण दस-यानंतर देईन, असे मुख्यमंत्र्यांनी बहुतेक मंत्र्यांना यापूर्वी सांगितले होते.