पणजी : राज्याचे वीज मंत्री असलेले भाजपाचे कुडचडेचे आमदार निलेश काब्राल यांनी केलेल्या शेरेबाजीमुळे भाजपा पक्ष अस्वस्थ झाला आहे. पूल पाहून पोट भरत नाही किंवा पूल बांधले आणि लोकांची पोटे जर रिकामी राहिली तर केवळ पुलाला पाहून लोक मते देत नाहीत, अशी टीका काब्राल यांनी करून भाजपमध्ये खळबळ उडवून दिली आहे. पक्षाने याची गंभीर दखल घेतली असल्याचे संघटनेतील सूत्रांनी सांगितले.
आमच्या सरकारने साधनसुविधा विषयक कामे खूप केली आहेत. कामे खूप सुरू आहेत. पूल वगैरे बांधले जात आहेत पण लोकांना पोटाचा विचार करावा लागतो. आपले पोट भरण्यासाठी म्हणजे उदरनिर्वाह चालावा म्हणून सरकारने काय केले याचा विचार लोक करतील. केवळ पुलावरून जायला मिळाले किंवा पूल पाहायला मिळाले म्हणून लोक मत देत नाही. पूल पाहून पोट भरत नाही, असे मंत्री काब्राल स्पष्टपणे बोलले.
गोव्यातील खनिज खाणी सुरू करण्याचा मार्ग केंद्र सरकार अजून खुला करू शकलेले नाही म्हणून मंत्री काब्राल नाराज आहेत. एका वृत्त वाहिनीला हेड ऑन कार्यक्रमात त्यांनी मुलाखत दिली. भाजपासाठी लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागा जिंकणे वाटते तेवढे सोपे नाही असेही काब्राल यांनी नमूद केले. आम्ही झोकून देऊन पक्षासाठी काम करूच, लोकांनी मते द्यावीत म्हणून लोकांना विनंतीही करू पण शेवटी लोक काय ते ठरवतील, असेही काब्राल म्हणाले. पक्षाच्या सभांना आले म्हणून लोक मत देत नाही. जर मनात वाटले तर सभेला न येणारे देखील मत देत असतात, असाही सल्ला अप्रत्यक्षरित्या भाजपाला काब्राल यांनी दिला.
दरम्यान, भाजपाने मंत्री काब्राल यांच्या विधानांची योग्य दखल घेतली असून पक्ष त्यांच्याशी चर्चा करील, असे भाजपाच्या दोघा प्रमुख पदाधिका-यांनी लोकमतला सांगितले. मायकल लोबो जे काही बोलतात, त्यापेक्षाही जास्त पुढे जाऊन व जास्त कडक काब्राल बोलल्याने भाजपची संघटना नाराज झाली आहे. काब्राल हे आता मंत्री आहेत, ते केवळ आमदार नाहीत, अशावेळी त्यांनी बोलताना विचार करायला हवा, ते स्वत:च्याच खनिज खाणी असल्याप्रमाणो व त्या स्वत:च्याच खाणी बंद झाल्यासारखे बोलतात, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या पक्ष संघटनेत उमटली आहे.