पणजी - देशाच्या सीमांवर युद्धजन्य स्थिती असूनही गोव्यात मात्र वाईन महोत्सव आणि कार्निव्हलसारख्या उत्सवांची धूम सुरू झाली आहे. पर्रीकर सरकारने अशा प्रकारचे सगळे महोत्सव तूर्त स्थगित ठेवावेत, अशा प्रकारची मागणी सोशल मीडियावरून देशप्रेमी नागरिक करू लागले आहेत. सरकारवर या विषयावरून जोरदार टीकाही होऊ लागली आहे.
पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर व अनेक भारतीय जवान त्यात शहीद झाल्यानंतर गोव्यातही चिंतेची स्थिती होती पण गोवा सरकारने सनबर्न क्लासिक हा इलेक्ट्रॉनिक नृत्य महोत्सव (ईडीएम) होऊ दिला. हजारो पर्यटक व स्थानिकांच्या सहभागाने वागातोर या किनारी भागात दोन दिवस ईडीएम चालला. मद्य आणि नृत्याच्या सहवासात हे सगळे घडले. याबाबतही सरकारच्या पर्यटन खात्यावर टीका झाली. काही मंत्री व आमदारांनी आपआपल्या मतदारसंघात युवकांना सनबर्न क्लासिक ईडीएमचे पासही वितरित केले.
कार्निव्हल हा उत्सव गोमंतकीयांना खा, प्या आणि मजा करा असा संदेश देतो. सध्या खाऊन- पिऊन मजा करण्यासारखी स्थिती देशात नाही. मात्र गोवा सरकारला याचे भान राहिलेले नाही. काही नगरपालिकांनाही याचे भान राहिलेले नाही. कार्निव्हल उत्सवाला येत्या 2 मार्च रोजी पणजीहून आरंभ होत आहे. पणजीसह अन्य विविध शहरांमध्ये कार्निव्हलनिमित्ताने चार दिवस चित्ररथ मिरवणुका होतील. पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी गोमंतकीयांना कार्निव्हलचा आनंद घेण्याचा सल्ला दिला आहे. आणखी कोणतेच टेन्शन गोमंतकीयांनी कार्निव्हलच्या काळात न घेता खा, प्या, मजा करा हा संदेश अंमलात आणावा, असे मंत्री आजगावकर यांनी सूचविले आहे.
सोशल मीडियावरून गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष सुभाष वेलिंगकर व इतरांनी सरकारवर टीका केली आहे. देशाच्या सीमांवरील स्थितीचा विचार न करता कार्निव्हल वगैरे साजरा करणे हे निषेधार्ह आहे. अशा सोहळ्य़ांशीनिगडीत राजकारण्यांचाही आपण धिक्कार करतो असे वेलिंगकर यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही कट्टर स्वयंसेवक व भाजपाच्या पाठीराख्यांनीही सध्या सगळेच सोहळे व महोत्सव स्थगित केले जावेत, असे मत सोशल मीडियावरून मांडले आहे. मात्र सरकारने कान बंद केल्यासारखी स्थिती आहे.
द ग्रेप एस्कपेड हा विविध वाईन्सचा महोत्सव आहे. द्राक्षे व काजूपासून तयार केली जाणारी सगळी मद्ये या महोत्सवावेळी प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवली जातात. सरकारच्या सहभागाने होणारा हा महोत्सव पणजीत गुरुवारी सायंकाळपासून सुरू होत आहे. सरकारने या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन केले आहे.