लोकमत न्यूज नेटवर्क पणजी :गोवा काजूला जीआय टॅग लवकरच मिळणार आहे. त्यामुळे सरकारने स्थानिक उत्पादनांना चालना देण्यासाठी आणि राज्यातील काजू उद्योगाच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना केल्या आहेत' असे उद्योग, व्यापार व वाणिज्य संचालनालयाच्या संचालक स्वेतिका सचान यांनी सांगितले. पणजी येथे झालेल्या ओडीओपी संपर्क कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
स्वेतिका सचान म्हणाल्या, "गोवा काजूला भौगोलिक संकेत (जीआय) दर्जा देणे, 'युनिटी मॉल'ची स्थापना आणि एक तालुका एक उत्पादन' योजनेची अंमलबजावणी या उपक्रमांमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळेल आणि गोव्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा दिसून येईल.
या कार्यक्रमात एक जिल्हा, एक उत्पादन या अंतर्गत माहिती देण्यात आली. संपर्क कार्यक्रम वन डिस्क्रिक्ट वन प्रॉडक्ट (ओडीओपी) योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने आयोजित केला होता.
उत्तर गोवा जिल्ह्यासाठी ओडीओपी योजनेत काजूला पहिले उत्पादन, तर फेणीला दुसरे उत्पादन म्हणून निवडण्यात आले आहे. तसेच दक्षिण गोवा जिल्ह्यात फेणीला पहिले उत्पादन आणि काजूला दुसरे उत्पादन म्हणून मान्यता मिळाली आहे.
गोव्याच्या विविध प्रकारच्या हस्तकला, कला आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविण्याच्या प्रयत्नांच्या अनुषंगाने राज्य सरकार 'युनिटी मॉल'ची स्थापना हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेत आहे. युनिटी मॉलच्या माध्यमातून सर्वसमावेशक रिटेल स्पेस पर्यटकांना गोव्याचे सार अनुभवण्यासाठी वन-स्टॉप डेस्टिनेशन एक जिल्हा, एक उत्पादन याबरोबरच युनिटी मॉलमध्ये स्थानिक कलाकुसरीच्या वस्तू आणि विविध राज्यांना एम्पोरियमसाठी प्रदर्शनासाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल.
यावेळी काजू आणि फेणी उद्योगातील प्रमुख घटकांचा समावेश असलेली पॅनेल चर्चादेखील आयोजित करण्यात आली. चर्चेत गोवा वन विकास महामंडळाचे नंदकुमार परब उत्पादन शल्क निरीक्षक विभागाचे शांबा नाईक आणि भौगोलिक संकेत (जीआय) चे नोडल अधिकारी, राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदेचे दीपक परब, गोवा काजू फेणी डिस्टिलर्स अँड बॉटलर्स असोसिएशनचे अध्यक्ष गुरुदत्त भगत आणि गोवा काजू उत्पादक संघटनेचे अध्यक्ष रोहित झांट्ये यांचा सहभाग होता. काजू उत्पादक आणि फेनी उत्पादक यांच्यात पॅनल चर्चा फलदायी ठरली. यावेळी प्रदर्शनी आयोजित केले होते.
दक्षिण गोव्यासाठी 'फेणी'
एक जिल्हा एक उत्पादन कार्यक्रमांतर्गत सरकारने दक्षिण गोवा जिल्ह्यासाठी फेणीची निवड पहिले उत्पादन म्हणून केली आहे. या प्रसिद्ध स्थानिक उत्पादनाच्या अधिकृत ब्रेडिंगचा मार्ग मोकळा झाला आहे. जीआय टॅगमुळे गोव्यातील काजूचा नावलौकिक आणि बाजारपेठ तर वाढेलच, शिवाय एकूणच काजू उद्योगाला ही मोठी चालना मिळेल असे प्रयत्न आहेत.