ठळक मुद्दे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे साडेतीन महिन्यांच्या खंडानंतर मंगळवारी पर्वरी येथील मंत्रालयातील आपल्या कार्यालयात दाखल झाले.मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात मुख्यमंत्री शेवटचे मंत्रालय तथा सचिवालयात आले होते.
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे साडेतीन महिन्यांच्या खंडानंतर मंगळवारी पर्वरी येथील मंत्रालयातील आपल्या कार्यालयात दाखल झाले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
गेल्या चतुर्थी सणावेळी म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात मुख्यमंत्री शेवटचे मंत्रालय तथा सचिवालयात आले होते. चतुर्थी सणावेळीच त्यांना कांदोळी येथील रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. कांदोळीपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पर्रा येथील आपल्या मूळ घरी जाऊन त्यांनी गणेश दर्शन घेतले होते. त्यानंतर सचिवालय तथा मंत्रालयात ते कधीच आले नव्हते. तथापि, मंगळवारी नववर्ष सुरू झाले आणि मुख्यमंत्री पर्रीकर सकाळी सचिवालय तथा मंत्रालयात पोहचले. पर्रीकर येणार असल्याची कल्पना पर्रीकर यांच्या कार्यालयातील अवघ्याच कर्मचाऱ्यांना दिली गेली होती. त्यामुळे ते कर्मचारी मंत्रालयाच्या खाली मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी थांबले होते.
पर्रीकर यांना पॅनक्रियाटिक कॅन्सरच्या आजाराशी लढावे लागत आहे. 2018 सालचे नऊ महिने त्यांना रुग्णालयात व घरी घालवावे लागले. उपचारांसाठी बहुतांश वेळ गेला. आता त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झालेली आहे. ते दोनवेळा अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील स्लोन कॅन्सर सेंटर फाऊंडेशनच्या रुग्णालयात दाखल झाले होते. तसेच मुंबईतील एका खासगी रुग्णालयाही 2018 साली त्यांना दोनवेळा दाखल केले गेले होते. बांबोळी येथील गोवा सरकारच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालयातही (गोमेकॉ) ते काही दिवसांसाठी गेल्यावर्षी दाखल झाले होते. पर्रीकर घराबाहेर पडू शकत नव्हते व त्यामुळे दोनवेळा त्यांनी आपल्या करंजाळे येथील खासगी निवासस्थानीच मंत्रिमंडळाच्या बैठका घेतल्या. मुख्यमंत्र्यांच्या आजारपणामुळे प्रशासन ठप्प झाल्याची टीका सातत्याने होत होती. पर्रीकर यांना मध्यंतरी नव्या तिसऱ्या मांडवी पुलावर आणले गेले होते. पर्रीकर हे नव्यावर्षाच्या पहिल्या दिवशी मंत्रालयात दाखल झाल्याने भाजपा आमदारांना समाधान वाटले.