पणजी : नववर्षाच्या पहिल्या दिवशीच मोठ्या धमुधडाक्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सचिवालयात आले व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पर्रीकर यांच्या या भेटीचे रुपांतर मोठ्या सोहळ्यात करून टाकले तरी, लगेच त्यांचे सचिवालयात येणे पुन्हा बंद झाले आहे. अर्थात पर्रीकर पुन्हा सचिवालय तथा मंत्रलयात येणे सुरू करतील पण 1 व 2 रोजी म्हणजे मंगळवार व बुधवारी सचिवालयात आल्यानंतर पर्रीकर मग मात्र पुन्हा आले नाहीत.
पर्रीकर यांना पॅनक्रिएटीक कॅन्सर असल्याने केमोथेरपी घ्यावी लागते. त्यांनी गेल्या गुरुवारी केमोथेरपी घेतली होती, असे एका मंत्र्याने सांगितले. पर्रीकर हे 2018 साली चार महिने सचिवालय तथा मंत्रालयात येऊ शकले नव्हते व त्यामुळे प्रशासनावर मोठा परिणाम झाला होता. पर्रीकर यांनी आपल्या खासगी निवासस्थानीच दोनवेळा मंत्रिमंडळाच्या बैठका घेतल्या होत्या. पर्रीकर यांची प्रकृती थोडी सुधारल्याने त्यांना पुन्हा केमोथेरपी देणो सुरू केले गेले. ते योग्य स्थितीत आहेत व पुन्हा मंत्रालयात येऊ लागतील, असे सुत्रांनी सांगितले. राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून परिमल रे यांनी ताबा घेतला असून रे यांनी प्रशासनाची सुत्रे हाती घेऊन अधिकाऱ्यांना व विविध खात्यांना सक्रिय करणे सुरू केले आहे.
पर्रीकर यांनी नव्या वर्षी सचिवालयात पाऊल ठेवून मंत्री व आमदारांच्या अनौपचारिक बैठकाही घेतल्या. त्यांनी काही फाईल्सही निकालात काढल्या. 2 जानेवारी रोजी ते दोन ते अडीच तास सचिवालयात होते. दुपारी जेवायला गेल्यानंतर मग सायंकाळच्या सत्रात मात्र ते गेल्या आठवड्यात कधीच सचिवालयात आले नाहीत. येत्या 29 पासून विधानसभा अधिवेशनास आरंभ होत आहे. तत्पूर्वी विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीला पर्रीकर येतील, असे सुत्रांनी सांगितले.