पणजी : माजी मंत्री बाबूश मोन्सेरात आणि मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यातील शत्रुत्व आणि मैत्री हे दोन्ही गोव्यातील राजकारणाला गेली 15 वर्षे परिचित आहे. कधी पर्रीकर व मोन्सेरात हे एकमेकांवर जोरदार टीका करत असल्याचे दिसून येते तर कधी हे दोन्ही नेते एकमेकांशी गुप्त राजकीय नाते आणि स्नेहसंबंध ठेवत असल्याचेही आढळून येते. सोमवारी (18 डिसेंबर )रात्री उशीरा अनेक वर्षानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे बाबूश यांच्या कौटुंबिक सोहळ्यात अन्य मंत्र्यांसोबत सहभागी झाले व त्यांनी बाबूशशी थोडावेळ मनमोकळ्या गप्पाही केल्या.2002 सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर मोन्सेरात हे पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. 2005 सालच्या सुमारास पर्रीकर आणि मोन्सेरात यांच्यात एवढे बिनसले की, मुख्यमंत्र्यांनी अचानक भ्रष्टाचाराच्या आरोपावरून मोन्सेरात यांच्याकडील नगर नियोजन खाते काढून घेतले. त्यामुळे मोन्सेरात यांनी लगेच मंत्रिपदाचा आणि भाजपाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देत अन्य आमदारांना घेऊन बंड केले आणि पर्रीकर यांचे सरकार पाडले.
आपले सरकार जाणं हा पर्रीकर यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का होता. मोन्सेरात यांना पर्रीकर आता कधीच माफ करणार नाहीत, असे त्यावेळी गोव्याच्या राजकारणात मानले गेले होते. मात्र 2007 सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी पुन्हा बाबूश व पर्रीकर यांच्यातील छुपे राजकीय राजकीय फिक्सींग गोव्याने अनुभवले. पणजी मतदारसंघात त्यावेळी बाबूशने भाजपला पडद्याआडून मदत केली व पर्रीकर यांचा पणजीतील विजय सोपा झाला. अन्यथा त्यावेळी काँग्रेसतर्फे दिनार तारकर पणजीत जिंकले असते, असे काही भाजपाविरोधी नगरसेवकांकडून आज देखील मानले जात आहे.
पर्रीकर यांनी अनेकदा विधानसभेत मोन्सेरात यांच्याविरोधात आरोप केले आहेत. एका वादग्रस्त प्रादेशिक आराखड्याच्या प्रकरणाच्या विषयावरूनही पर्रीकर यांनी मोन्सेरात यांना लक्ष्य बनविले होते. मात्र पर्रीकर आणि बाबूश यांच्यातील संबंध 2007 सालानंतर कधी तुटले नाहीत. पर्रीकर केंद्रात संरक्षण मंत्रीपदी असतानाही बाबूश हे दिल्लीत जाऊन पर्रीकर यांना भेटून यायचे. मात्र मध्यंतरी मोन्सेरात यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा पोलिसांत नोंद झाला व पुन्हा बाबूश आणि भाजप यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. मोन्सेरात आणि पर्रीकर यांच्यात नव्याने शत्रुत्व निर्माण झाल्यासारखी स्थिती तयार झाली.
आपल्याविरोधात भाजपमधीलच काही हितशत्रूंनी कुभांड रचल्याची मोन्सेरात यांची भावना बनली. त्यामुळे मोन्सेरात यांनी र्पीकर यांच्याशी बोलणो सोडले होते. गेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत बाबूशचा पणजीत भाजपने पराभव केला. त्यानंतर र्पीकर जेव्हा केंद्रातील मंत्रीपद सोडून पुन्हा गोव्याच्या राजकारणात मुख्यमंत्री म्हणून आले, त्यानंतर नव्याने पर्रीकर व बाबूश यांच्यातील मैत्रीचा अध्याय सुरू झाला. काही महिन्यांपूर्वी पणजीत विधानसभेची पोटनिवडणूक झाली. मोन्सेरात यांनी पणजीतून पर्रीकर यांच्याविरोधात लढू नये म्हणून भाजपामधील एका गटाने व गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी प्रयत्न केले. मोन्सेरात यांनी माघार घेत आपण पणजीत पर्रीकर यांना पाठींबा देत असल्याचे जाहीर केले व पर्रीकर आणि बाबूश यांच्यातील मैत्री नव्याने जगजाहीर झाली. आपण लढणार नाही ही घोषणा करण्यापूर्वीही बाबूशने र्पीकर यांची भेट घेतली होती.
पर्रीकर हे 2003 साली एकदाच बाबूशच्या वाढदिन सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यानंतर ते बाबूशच्या कुठल्याच सोहळ्य़ाला गेले नव्हते. सोमवारी रात्री मात्र र्पीकर हे मोन्सेरात यांच्या पुत्रच्या विवाह सोहळ्य़ानिमित्त आयोजित स्वागत सोहळ्य़ात सहभागी झाले. पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर यांच्यासह अनेक मंत्री, भाजपाचे व काँग्रेसचे अनेक आमदार या सोहळ्य़ात सहभागी झाल्याचे लोकांना पहायला मिळाले. पणजीतील एका मोठ्या हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडला. पर्रीकर आल्यामुळे बाबूशला अधिक आनंद झाला, असे बाबूशच्या काही कार्यकर्त्यांचे म्हणणं आहे.