पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या तब्येतीवरुन दिवसभर राज्यात आणि राज्याबाहेरही प्रचंड अफवा पसरल्या. मनोहर पर्रीकर कोमात गेल्याचीही चर्चा काही जणांनी पसरविली, पण स्थिती तशी नाही. मनोहर पर्रीकर यांची तब्येत स्थिर असून ते फक्त डोळे उघडतात, असे सांगण्यात येत आहे.
मनोहर पर्रीकर यांना झोपूनच रहावे लागते. त्यांचा रक्तदाब खूप कमी झाला होता. त्यात आता सुधारणा झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांत दोनवेळा त्यांचा रक्तदाब एकदम कमी झाला होता. मात्र, त्यांना कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृतीत सुधारणा झाली. आताही त्यांना वारंवार कृत्रिम ऑक्सिजन द्यावा लागतो. सकाळच्यापेक्षा सायंकाळी त्यांची स्थिती सुधारली पण स्थिती चिंताजनक आहे, याची कल्पना भाजपाच्या सर्वच आमदारांना आलेली आहे. मनोहर पर्रीकर यांना भेटण्यासाठी सहा मंत्री- आमदार त्यांच्या निवासस्थानी गेले होते. पण, ते प्रत्यक्ष मनोहर पर्रीकर यांना भेटू शकले नाहीत. मनोहर पर्रीकर त्यांच्यासोबत बोलण्याच्या स्थितीत नव्हते.
दरम्यान, भाजपाने आपल्या सर्व आमदारांना गोव्यातच राहण्याची सूचना केलेली आहे. मुंबईत फुटबॉल मॅच वगैरे पहायला कुणी जाऊ नये, अशीही सूचना आमदारांना करण्यात आली आहे. सर्व आमदारांना मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्याच्या स्थितीविषयीची कल्पना भाजपा कोअर टीमने दिलेली आहे. मनोहर पर्रीकर यांची स्थिती तूर्त स्थिर आहे पण, ती वारंवार बिघडू लागली आहे. त्यामुळे नेतृत्व बदल देखील करावा लागू शकतो याची कल्पना आमदारांना आली आहे. भाजपाच्या सर्व आमदारांची बैठक झाली.
गोव्याचे माजी अॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी मनोहर पर्रीकर यांची शनिवारी भेट घेतली. नाडकर्णी आले तेव्हा मनोहर पर्रीकर यांनी डोळे उघडले. नाडकर्णी म्हणतात की, मनोहर पर्रीकर यांनी आपला हातही हातात घेतला. जास्त काही आपण बोलू शकलो नाही. पण लोकांमध्ये पसरलेल्या अफवा ह्या केवळ अफवाच आहेत, असे नाडकर्णी यांनी लोकमतला सांगितले.