पणजी : गेल्या रविवारी डिहायड्रेशन आणि कमी रक्तदाबाच्या त्रासामुळे बांबोळी येथील गोमेकॉ या सरकारी इस्पितळात दाखल झालेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे गुरुवारी पाचव्या दिवशीही इस्पितळातच आहेत. ते वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे गोव्यातील प्रशासनावर परिणाम झाल्याची टीका आता विविध घटकांमधून होऊ लागली आहे. मुख्यमंत्र्यांनी पदाचा ताबा दुस-या कुठच्याच मंत्र्याकडे दिलेला नाही. ब-याच फाईल्स प्रलंबित उरल्या आहेत. कारण मुख्यमंत्र्यांकडे एकूण 23 खाती आहेत. त्यातही अर्थ, खाण, गृह, अबकारी, पर्यावरण, उद्योग अशी खाती ही जास्त महत्त्वाची आहेत.
राज्यात घटनात्मक पेचप्रसंगासारखी स्थिती असल्याचे मत केंद्रीय कायदा खात्याचे माजी मंत्री रमाकांत खलप यांनीही एके ठिकाणी व्यक्त करून राज्यपालांनी किंवा पंतप्रधानांनी अशा परिस्थितीत हस्तक्षेप करावा, अशी मागणी खलप यांनी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनीही मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याविषयी खरी माहिती लोकांसमोर भाजपाने ठेवावी, अशी मागणी केली व सगळी प्रशासकीय यंत्रणा सध्या कोलमडल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत प्रथमच मगोपचे ज्येष्ठ नेते असलेले मंत्री सुदिन ढवळीकर हे गुरुवारी सायंकाळी खाणप्रश्नी चर्चा करण्यासाठी सर्व पक्षीय आमदारांची बैठक घेणार आहेत. मगोप हा पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपाप्रणीत आघाडीचा प्रमुख घटक आहे. या आघाडीचा दुसरा एक घटक पक्ष गोवा फॉरवर्ड आहे. या पक्षाचे अध्यक्ष असलेले कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनी थोडी वेगळी भूमिका घेतली आहे. भाजपकडे मगोप व गोवा फॉरवर्डपेक्षा जास्त आमदार आहेत. र्पीकर यांनी वैद्यकीय कारणास्तव जरी विश्रंती घ्यावी असा निर्णय घेतला तरी, गोव्यात वेगळी राजकीय समीकरणे मांडण्याचा प्रयत्न गोवा फॉरवर्ड करणार नाही, कारण पर्रीकर यांच्या नेतृत्वासोबत राहण्याची भूमिका प्रारंभापासून गोवा फॉरवर्डने घेतली असल्याचे भाष्य मंत्री सरदेसाई यांनी केले आहे.
दरम्यान, आरोग्य मंत्री विश्वजित राणे हे रोज सकाळी गोमेकॉ इस्पितळाला भेट देत आहेत. गुरुवारीही सकाळी राणे यांनी गोमेकॉ इस्पितळाला भेट दिली व डॉक्टरांशी चर्चा केली. पर्रीकर यांची प्रकृतीही त्यांनी जाणून घेतली. गोमेकॉत मुख्यमंत्री व्हीव्हीआयपी खोलीमध्ये उपचार घेत आहेत. तिथे लोकांना सोडले जात नाही. कडक सुरक्षा व्यवस्था आहे. मुख्यमंत्र्यांच्या खोलीसह अन्यत्र रुग्णांसाठी ज्या चादरी होत्या, त्यांचा दर्जा सुधारावा अशी सूचना गोमेकॉच्या प्रशासनाला वरिष्ठ पातळीवरून आली. त्यामुळे लगबगीने चादरी बदलण्यात आल्या.मुख्यमंत्री पर्रीकर यांची स्थिती सुधारली आहे पण त्यांचा आजार लक्षात घेता ते वैद्यकीय निरीक्षणाखाली असणो डॉक्टरांना गरजेचे वाटते, असे सूत्रांनी सांगितले.