पणजी - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे बुधवारीही सकाळी पर्वरी येथील सचिवालय तथा मंत्रालयातील आपल्या कार्यालयात दाखल झाले. त्यांनी कार्यालयातून काम करणे सुरू केले असून अधिकाऱ्यांना ते कामाविषयी विविध सूचनाही करू लागले आहेत.
पर्रीकर गंभीर आजारामुळे चार महिने सचिवालयात येऊ शकले नव्हते. नव्या वर्षाच्या प्रारंभीच म्हणजे मंगळवारी पर्रीकर हे पर्वरी येथील सचिवालयात दाखल झाले. तिथे भाजपाचे मंत्री, आमदार व कार्यकर्त्यांनी पर्रीकर यांचे स्वागत केले. पर्रीकर यांच्या नाकात टय़ुब आहे. शिवाय त्यांना चालताना थोडा आधार घेऊन चालावे लागते. पायऱ्या उतरताना तर आधार घ्यावाच लागतो. गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळाचे (गोमेकॉ) कार्डिओलॉजीस्ट कोलवाळकर हे त्यांच्यासोबत असतात. चार महिन्यांच्या खंडानंतर अचानक मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सचिवालयात येऊन नव्या वर्षी गुड न्यूज दिली अशी प्रतिक्रिया भाजपा समर्थकांमध्ये मंगळवारी व्यक्त झाली. विरोधी काँग्रेस पक्षाने मात्र याची खिल्ली उडवली. भाजपाने पर्रीकर यांचे प्रदर्शन मांडले आहे, अशी टीप्पणी काँग्रेसचे प्रवक्ते व माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांनी व्यक्त केली.
पर्रीकर हे दुसऱ्या दिवशीही म्हणजे बुधवारीही सचिवालयातील आपल्या केबिनमध्ये येतील असे काँग्रेसला वाटले नव्हते पण पर्रीकर आले. पर्रीकर यांचे करंजाळे येथील खासगी निवासस्थान चार किलोमीटर अंतरावर आले. पर्रीकर बराचकाळ आपल्या खासगी निवासस्थानामधून बाहेर पडले नव्हते. आता ते सचिवालयात मंत्र्यांच्या व अधिकाऱ्यांच्या बैठकाही घेऊ लागले आहेत. येत्या आठवड्यात ते मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची शक्यता आहे. पर्रीकर हे 29 पासून सुरू होत असलेल्या विधानसभा अधिवेशनातही भाग घेतील. सभापती प्रमोद सावंत यांना त्यांनी तसे सांगितले आहे.
दरम्यान, गोव्याचे नवे मुख्य सचिव म्हणून परिमल राय हे गोवा सरकारच्या सेवेत बुधवारपासून रुजू झाले आहेत.