पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमधून येत्या दोन दिवसांत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पर्रीकरांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यांच्या विविध वैद्यकीय तपासण्यासही करण्यात आल्या आहेत. गेल्या गुरुवारी संध्याकाळी गोवा विधानसभेचे तीन दिवसीय अधिवेशन संपल्यानंतर पर्रीकर एम्समध्ये दाखल झाले होते. 14 ऑक्टोबर 2018 रोजी पर्रीकर एम्समध्ये उपचार घेऊन गोव्यात परतले होते. त्यानंतर ते गोव्याबाहेर कुठेच उपचारांसाठी किंवा वैद्यकीय तपासणीसाठी गेले नव्हते. पर्रीकर यांच्या करंजाळे- दोनापावल येथील खासगी निवासस्थानी त्यांच्यावर उपचार सुरू होते. काही सरकारी डॉक्टर्स पर्रीकर यांच्या सेवेत असायचे. गेल्या गुरुवारी त्यांनी आपल्या आरोग्याच्या तपासणीसाठी एम्समध्ये जावे असे ठरविले आणि त्यानुसार ते दिल्लीकडे रवाना झाले.
पर्रीकर यांना गुरुवारी (7 फेब्रुवारी) किंवा शुक्रवारी (8 फेब्रुवारी)एम्समधून डिस्चार्ज दिला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. गोव्याचे काही मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी फोनवरून पर्रीकरांच्या संपर्कात आहेत. सचिवालयातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील एक अधिकारी दोन दिवसांपूर्वीच एम्समध्ये पर्रीकर यांची विचारपूस करण्यासाठी दाखल झाले. ते अधिकारी अजूनही एम्समध्येच आहेत. पर्रीकर यांना लवकरच डिस्चार्ज मिळेल असे त्या अधिका-याने लोकमतला सांगितले. पर्रीकर यांची भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर आणि दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर तसेच गोवा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी भेट घेतली. पर्रीकर यांची स्थिती चांगली आहे, त्यांनी आमच्याशी गप्पाही केल्या, असे तानावडे यांनी सांगितले.
दरम्यान, राफेल प्रकरण नव्याने चर्चेत आल्यानंतर भाजपाच्या श्रेष्ठींनी पर्रीकर यांना दिल्लीत तातडीने नेले. पर्रीकर यांच्या जीवास धोका संभवतो, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत केला. पर्रीकर आपण पूर्ण जोषात असल्याचे विधानसभेत सांगत होते, मग त्यांना अचानक रात्रीच्या सुमारास आरोग्याच्या कारणास्तव दिल्लीला जाण्याची गरज का भासली? असा प्रश्न चोडणकर यांनी केला. राफेल प्रकरणी महत्त्वाच्या फाईल्स आणि माहिती, कागदपत्रे पर्रीकर यांच्या ताब्यात आहेत, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.