पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनाही मुख्यमंत्री भेटले. आपण गोव्याच्या खनिज खाणप्रश्नी व अन्य विषयांबाबत पंतप्रधानांशी चर्चा केल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री सात महिन्यांनंतर बुधवारी सायंकाळी दिल्लीत दाखल झाले. पंतप्रधानांनी त्यांना गुरुवारी भेटीसाठी वेळ दिली होती. राज्यात खनिज खाण धंदा बंदच आहे. मध्यंतरी गोवा सरकार खनिज विकास महामंडळ स्थापन करील अशी चर्चा झाली होती. मात्र सरकारने महामंडळही स्थापन केले नाही. न्यायालयीन लढाईतूनही खाणप्रश्नी अजून तोडगा निघालेला नाही. यापूर्वीही अनेकदा केंद्रीय गृह मंत्री अमित शहा, यापूर्वीच्या खाण मंत्र्यांसमोर तसेच पंतप्रधान मोदी यांच्यासमोरही गोवा सरकारने खाण प्रश्न मांडलेला आहे. आता नव्याने मुख्यमंत्री सावंत यांनी तोच विषय मांडला.
राज्याची आर्थिक स्थिती सध्या खूप अडचणीची आहे. उत्पन्न कमी झाले आहे. महसुल घटला तरी, केंद्राकडून विशेष असे कोणतेच आर्थिक पॅकेज मिळालेले नाही. जीएसटीची नुकसान भरपाईही मिळत नाही व उत्पन्न वाढविण्याचे नवे मार्गही गोवा सरकारला आढळलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी याविषयीही पंतप्रधानांशी चर्चा केली असावी असे गोव्यात मानले जात आहे. राज्यातील राजकीय स्थिती, विरोधकांकडून केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांना केला जाणारा विरोध, नव्या राज्यपालांची गोव्यात झालेली नियुक्ती याविषयीही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केल्याचे कळते.
दरम्यान, आपण केंद्रीय खाण मंत्री जोशी यांना भेटलो तेव्हा मंत्र्यांचे सचिवही उपस्थित होते. आपण खाणप्रश्नी सविस्तर चर्चा केली. येत्या दिवसांत सकारात्मक तोडगा निघेल, अशी आम्हाला आशा वाटते, असे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे.