पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे रशियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. सोमवारी (12 ऑगस्ट) मुख्यमंत्री सावंत यांनी रशियामध्ये परिषदेत भाग घेतला. खनिज, धातू, मासेमारी अशा विषयाशीनिगडीत एका सत्राचे मुख्यमंत्री सावंत यांनी अध्यक्षस्थानही भुषविले.
मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार गेल्या मार्च महिन्यात अधिकारावर आले. पाच महिन्यांचा कालावधी सरकारने पूर्ण केला. सावंत हे पूर्वी सभापती होते पण त्यांना विदेश दौऱ्यावर जाण्याची संधी कधी मिळाली नव्हती. यावेळी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ रशियाला गेले आहे. देशातील पाच राज्यांचे मुख्यमंत्री या शिष्टमंडळाचा भाग आहेत. त्यात गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे.
गोव्यासारख्या छोट्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा या शिष्टमंडळात सहभाग झाल्याबाबत आनंद व अभिमानही वाटतो, असे सावंत यांनी रशियाला निघण्यापूर्वी पत्रकारांना सांगितले. आपल्या रशिया दौऱ्याचा गोव्याच्या पर्यटन आणि खनिज खाण क्षेत्राला लाभ व्हावा असाही आपला हेतू आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. सोमवार व मंगळवार असे दोन दिवस व्लादिवोस्तोक, रशिया येथे परिषद चालेल. विविध सत्रे पार पडतील. भारत व रशियामधील उद्योगांचे प्रतिनिधीही परिषदेत सहभागी झाले आहेत. आपण ज्या सत्राचे अध्यक्षस्थान भुषविले, त्याविषयीची छायाचित्रे सावंत यांनी रशियामधून सोशल मीडियावर अपलोड केली आहेत.
गोव्यातील खनिज व्यवसाय क्षेत्रात नवे काही करता यावे तसेच रशियन पर्यटकांची संख्या गोव्यात वाढावी या दृष्टीकोनातूनही मुख्यमंत्री प्रयत्न करतील असे सरकारी सुत्रांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री 14 रोजी रात्री गोव्यात परततील आणि 15 रोजी पणजीतील जुन्या सचिवालयासमोर होणाऱ्या भारतीय स्वातंत्र्यदिन सोहळ्यात ते सहभागी होतील.