पणजी : केरळहून मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सोमवारी दिल्ली गाठली व तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. अनेक विषयांबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली.
मोपा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी येत्या नोव्हेंबर महिन्याच्या मध्यास पंतप्रधानांच्या हस्ते केली जाईल. गोव्यात एकाचवेळी तीन प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. मोपा विमानतळ, तुयें येथील इलेक्ट्रॉनिक सिटी आणि बांबोळी येथे अकरा सुपरस्पेशालिटींसाठी स्वतंत्र विभागाचे बांधकाम या तीन प्रकल्पांची पायाभरणी नोव्हेंबरच्या मध्यास होईल. पंतप्रधानांनी त्यासाठी गोव्यात येणो मान्य केले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी दिल्लीहून लोकमतला सांगितले.
ब्रिक्स परिषदेसही येत्या 14 ऑक्टोर रोजी पंतप्रधान गोव्यात येतील. त्यानंतर पुन्हा नोव्हेंबरमध्ये ते येतील. गोव्यातील राजकीय स्थिती तसेच भाजपचे काम याबाबतही आपण मोदी यांना माहिती दिली. ब्रिक्स परिषदेची तयारी आम्ही कशी जोरात चालविली आहे हेही त्यांना सांगितले, असे मुख्यमंत्री म्हणाले. पार्सेकर आज सकाळी गोव्यात परततील.