- अप्पा बुवाफोंडा - मुर्डी-खांडेपार येथील ग्रामस्थांनी सोमवारी (ता.२१) पणजी येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी बंधाऱ्याला ग्रामस्थांचा विरोध का आहे, हे त्यांना पटवून सांगितले. त्यावर सावंत यांनी आपण स्वतः या बंधाऱ्याची पाहणी करणार असून तुमच्या समस्येबाबत निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले. तोपर्यंत गावात १४४ कलम हे लागू राहणार तसेच रस्त्याचे कामही सुरुच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कृषिमंत्री रवी नाईकही उपस्थित होते.
पणजीत झालेल्या या बैठकीत जलस्रोत खात्याचे वरिष्ठ अधिकारी प्रमोद बदामी, साहाय्यक अभियंता शैलेश नाईक तर ग्रामस्थांपैकी अभिजीत प्रभू देसाई, झेवियर, पंच अभिजीत गावडे, पंच मनीष नाईक, शिवानंद गावडे व गुरुदास नाईक आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी म्हणणे शांतपणे ऐकूण घेतले. त्यानंतर त्यांनी आपण शुक्रवार किंवा शनिवारी मुर्डी-खांडेपार या ठिकाणी येणार असून येथे पाहाणी केल्यानंतर हा बंधारा इतर ठिकाणी हलवावा का, याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले.