पणजी - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हयातच नाहीत अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते जितेंद्र देशप्रभू यांनी केल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अनेक महिन्यांच्या खंडानंतर त्यांच्या खासगी निवासस्थानी राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची (आयपीबी) बैठक घेतली. मुद्दाम त्या बैठकीचे छायाचित्र काढून प्रसार माध्यमांना पाठविले गेले पण त्या छायाचित्रावरून सोशल मीडियावर आता नेटीझन्समध्ये वाद पेटला आहे.
नेटीझन्समध्ये दोन गट पडले आहेत. फेसबुकवरून समर्थनार्थ आणि विरोधात अशा दोन प्रकारे दोन गटांकडून दावे व प्रतिदावे केले जात आहेत. पर्रीकरांचे बैठकीचे छायाचित्र हा या सगळ्य़ा वादाचा केंद्रबिंदू आहे. पर्रीकर हे गंभीर आजारी असतानाही भाजपाने अट्टाहासाने त्यांना बैठकीसाठी बसविले अशा प्रकारचा सूर एका गटाने लावला आहे. काही नाटककार, कलाकार, पत्रकार यांनीही तशाच टीप्पण्या फेसबुकवर केल्या आहेत. दुसऱ्या बाजूने पर्रीकर यांच्याविषयी अभिमान वाटतो, त्यांना राज्याच्या हिताविषयी चिंता असल्यानेच आजारपणातही त्यांनी त्यांच्या घरी बैठक घेतली अशा टीप्पण्या सध्या भाजपाचे युवा कार्यकर्ते करत आहेत. देशप्रभू यांनी केलेल्या टीकेमुळेच अट्टाहासाने पर्रीकर यांना गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची बैठक घ्यायला लावणे व त्याबाबतचा फोटो प्रसार माध्यमांकडे पाठविणे ही थट्टा आहे आणि पर्रीकर यांच्या जीवाशी मांडलेला तो अमानवी खेळ आहे अशी शेरेबाजी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व काही कथित तटस्थ लेखकांनीही केली आहे.
भाजपाच्या कार्यकर्त्यांनी व काही आमदारांनीही काँग्रेसवर टीका चालवली आहे. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या बैठकीचा व्हिडिओ द्या, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. या उलट भाजपाने देशप्रभू यांना टार्गेट केले असून आता कुणाचे श्राद्ध घालायचे ते सांगा असे आव्हान देशप्रभू यांना दिले आहे. देशप्रभू यांची टीका ही कुणाच्याही जिव्हारी लागेल अशीच होती असे भाजपाचे म्हणणे आहे. मंत्री विजय सरदेसाई यांनीही काँग्रेसने अशा प्रकारची टीका टाळायला हवी व मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याविषयी सनसनसनाटी निर्माण करण्याच्या फंदात पडू नये असा सल्ला काँग्रेसला दिला आहे.