पणजी: उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांचा पुत्र रेमंड याच्या बोगस पदवी प्रकरणात मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल मागितला आहे.
उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात अव्वल कारकूनपदासाठी रेमंड याने बोगस पदवी सादर केल्याचा आयरिश रॉड्रिग्स यांचा आरोप आहे. यासंबंधी जिल्हाधिकारी तसेच मुख्य सचिवांकडे त्यांनी तक्रारीही केल्या होत्या. या पदासाठी जे १६ उमेदवार निवडण्यात आले त्यात रेमंड याचा समावेश आहे.
रेमंड याने उत्तर जिल्हाधिकारी कार्यालयात अव्वल कारकूनपदासाठी अर्ज करताना बोगस विद्यापीठाची बीए पदवी सादर केल्याचे निरीक्षण गोवा विद्यापीठानेही नोंदविले होते. आयरिश यांनी या पदवीबाबत संशय उपस्थित करुन तक्रार केल्यानंतर उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी यासंबंधी गोवा विद्यापीठाला चौकशीचे आदेश दिले होते. त्यास अनुसरुन गोवा विद्यापीठाचे निबंधक वाय.व्ही.रेड्डी यांनी आपला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला. तींत लखनौस्थित ज्या भारतीय शिक्षा परिषद विद्यापीठाची बीए पदवी रेमंड यांनी सादर केली आहे ते विद्यापीठ बोगस असल्याचे आढळून आल्याचे म्हटले आहे.
रेमंड याने पदवीबरोबरच सादर केलेल्या संगणक अभ्यासक्रम प्रमाणपत्रांबाबतही आयरिश यांनी संशय व्यक्त केला आहे. या पदासाठी संगणक पदविका अभ्यासक्रम आवश्यक असताना प्रमाणपत्रे कशी स्वीकारली असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.