पणजी : चिंबल येथील नियोजित आयटी पार्कबाबत या महिन्याच्या अखेरीस सरकारकडून श्वेतपत्रिका व सविस्तर योजना जाहीर केली जाईल, असे माहिती व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रोहन खंवटे यांनी बुधवारी येथे जाहीर केले. काहीजण चिंबलमध्ये आयटी पार्क नको, अशी भूमिका घेत असले तरी, स्थानिक ग्रामपंचायतीने तशी भूमिका घेतलेली नाही.
तसेच सरकारनेही आयटी पार्क उभे करण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री खंवटे यांनी सांगितले, की, आयटी पार्कमुळे मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती होईल व स्थानिकांना त्या रोजगार संधींचा लाभ मिळेल. लोकांमध्ये शंका राहू नये म्हणून आयटी पार्कविषयी सविस्तर माहिती देणारी श्वेतपत्रिका व एकूण योजना आम्ही लोकांसमोर मांडणार आहोत. या महिन्याच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लोकांसमोर योजना मांडली जाईल.
आयटी पार्कचा व चिंबलच्या तळ्य़ाचा परस्पराशी काही संबंध येत नाही. तळे खूप दूर आहे, असे मंत्री खंवटे यांचे म्हणणे आहे. दरम्यान, तुयें येथे इलेक्ट्रॉनिक सिटीचेही काम सरकार पुढे नेत आहे. पर्वरी, मोरजी व अन्य काही ठिकाणीही आयटीविषयक उपक्रम सुरू करण्याचा संकल्प सरकारने सोडलेला आहे. चिंबल येथे नुकतीच ग्रामसभा पार पडली. त्यावेळी ग्रामस्थांमध्ये दोन गट दिसून आले. चिंबलवर आयटी पार्क लादले जाऊ नये अशी भूमिका काही ग्रामस्थांनी घेतली व चिंबलचे तळे तसेच तेथील मोठी जमीन धोक्यात येईल अशी भीती व्यक्त केली. दुस:याबाजूने चिंबलच्या सरपंचानी मात्र आयटी पार्कला पाठींबा देणारा ठराव ग्रामसभेत संमत झाल्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात ठराव संमत झालेला नाही, असा दावा दुस-या दिवशी ग्रामस्थांच्या एका संघटनेने पत्रकार परिषद घेऊन केला व सखोल चौकशीची मागणी केली.