पणजी - गोव्यात इयत्ता पहिली ते नऊवीच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर झाले असून शैक्षणिक प्रवेशासाठी खात्याने यंदा निर्बंध घातलेले आहेत. विद्यालयांनजीक राहणा-या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार असून देणग्या घेणा-या व्यवस्थापनांचे अनुदान होणार बंद केले जाईल. प्रवेशासाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. सचिवालय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बैठकीत या गोष्टींना हिरवा कंदिल दाखवला असून वरील दोन्ही विषयांशी संबंधित परिपत्रके बुधवारी काढण्यात येणार आहेत.
सर्व सरकारी तसेच अनुदानित विद्यालयांना हे निर्बंध लागू होतील. शहरांमधील शाळा, विद्यालयांमध्ये प्रवेशासाठी पालक गर्दी करतात आणि शाळेपासून जवळ राहणा-या मुलांना अनेकदा प्रवेशापासून वंचित व्हावे लागते. त्याचबरोबर ग्रामीण भागातील शाळाही पटसंख्येअभावी ओस पडतात. या गोष्टी टाळण्यासाठी हा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे.
प्राथमिक शाळेसाठी १ किलोमीटरपर्यंतच्या विद्यार्थ्यांना, शाळेसाठी 3 किलोमीटरपर्यंतच्या तर हायस्कूल प्रवेशासाठी 5 किलोमीटरपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल. दहावीला शंभर टक्के निकाल मिळविणा-या विद्यालयांमध्ये आपल्या मुलांना प्रवेश मिळावा, असा पालकांचा आग्रह असतो त्यासाठी घरापासून दूर विद्यालय असले तरी तेथे पाल्यांना पाठवण्याची तयारी असते. अशावेळी शहरांमधील काही मोजक्याच शाळांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पालक गर्दी करीत असतात. त्यामुळेच हे निर्बंध घालण्यात आलेले आहेत.
शिशुवर्ग, इयत्ता पहिली किंवा पाचवीसाठी प्रवेशाकरिता काही शाळा व्यवस्थापने मोठ्या रकमेच्या देणग्या मागतात. अनेकदा शाळेसाठी इमारत बांधण्याच्या नावाखालीही देणग्या घेतल्या जातात. यासंबंधीच्या अनेक तक्रारी खात्याकडे सर्रास येत असत. सरकारने याची गंभीर दखल घेत अशा शाळांच्या व्यवस्थापनांवर दंडात्मक किंवा प्रसंगी अनुदान बंद करण्याची कारवाई करण्याचा निर्णय झाला आहे.
2017-18 च्या या शैक्षणिक अहवालातून काही आकडेवारी समोर आली आहे. त्याप्रमाणे राज्यात 1252 लोकांमागे एक प्राथमिक शाळा, 3515 लोकांमागे एक माध्यमिक शाळा आणि 13,505 लोकांमागे एक उच्च माध्यमिक विद्यालय आहे. प्राथमिक आणि मिडल स्कूल स्तरावर 24 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक तर माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर 21 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षण असे प्रमाण आहे. राज्यातील शैक्षणिक वर्ष 4 जूनपासून सुरु होत असून त्या दिवशी शाळा सुरु होतील.