पणजी : निवडणुका जवळ आलेल्या असल्याने प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याचे राजकारण राज्यात वाढत आहे. प्रत्येक प्रकल्पाला विरोध करणे हे गोव्याच्या हिताचे नव्हे, काही शक्ती विरोधासाठी विरोध करण्याच्या हेतूनेच वावरत आहेत, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी येथे सांगितले.
वीज वाहिन्यांचेही काम जर करता आले नाही तर लोकांच्या घरांमध्ये वातानुकूलित यंत्रणा तसेच उद्योग बंद पडतील. घरात तीन-चार वातानुकूलित यंत्रणा लावून अनेकजण झोपतात पण वीज वाहिन्यांचा प्रकल्प झाला नाही तर यंत्रणा चालू शकणार नाहीत. काहीजण लंडनमध्ये राहतात व मोलेच्या प्रकल्पाला विरोध करतात. मोले कुठे व लंडन कुठे याचा तरी विचार व्हायला हवा, असे मुख्यमंत्री म्हणाले.
प्रत्येक प्रकल्पाला अर्थहीन पद्धतीने विरोध करण्यासाठीच काही शक्ती वावरत आहेत. पुढील वीस वर्षानंतर कधी तरी राष्ट्रीय महामार्गाचे काम होईल पण त्याचे नियोजन आतापासूनच करावे लागते. आम्ही ते नियोजन सुरू केले तरी विरोध केला जातो. बेतुल बंदराच्या विषयावरूनही काहीजण अपप्रचार करू पाहतात. ते बंदर आम्ही यापूर्वीच रद्द करून घेतले आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. आमचे सरकार सामान्य माणसाचा व समाजात सर्वात शेवटपर्यंत असलेल्या घटकाच्या विकासासाठी वावरत आहे.
गोवा सरकारने हे राज्य स्वयंपूर्ण करण्यावर भर दिला आहे. अधिकाऱ्यांना त्यासाठी तयार केले गेले आहे. वरिष्ठ अधिकरी पंचायतींना भेट देतील. गोवा मुक्त होऊन साठ वर्षे झाली पण अजूनही काही मूलभूत समस्या येथे कायम आहेत. त्या सोडविल्या जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले. आयआयटीसारख्या चांगल्या प्रकल्पालाही काहीजण विरोध करतात. हे ठीक नव्हे. अशा प्रकारचे प्रकल्प यायलाच हवेत. लोकांनी चर्चेसाठी यावे, आपण स्वत: लोकांचे सगळे म्हणणे ऐकून घेतो. आम्ही प्रश्न सोडवतो असे मुख्यमंत्री म्हणाले.