पणजी : मुंबई येथील लिलावती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झालेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांच्यात सुधारणा झाली असून ते रविवारपर्यंत गोव्यात परततील अशी माहिती शासकीय सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्री गेल्या बुधवारी सायंकाळी अमेरिकेहून अकरा दिवसांचे उपचार घेऊन गोव्यात परतले होते. न्यूयॉर्कमधील स्लोन केटरींग स्मृती रुग्णालयात ते उपचार घेत होते. त्यांच्यासोबत गोव्याच्या सरकारी रुग्णालयाचे डॉक्टर श्री. कोलवाळकर हेही अमेरिकेला गेले होते. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी गोव्यात परतल्यानंतर विश्रांती घेणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी विश्रांती घेतली नाही. गोव्यातील दाबोळी विमानतळावर पोहचल्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश भाजप नेत्यांकडून हाती घेतला व ते गर्दीमध्ये बराचवेळ चालत आले. त्यानंतर ते गाडीने आपल्या निवासस्थानी निघून गेले.
गुरुवारी सकाळी ते पर्वरी येथील मंत्रालयात आले नाहीत. दुपारपर्यंत ते मंत्रालयात येतील असे अपेक्षित होते. मात्र दुपारीच त्यांना उलट्या सुरू झाल्या. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी मुंबईतील रुग्णालयातील डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरांनी त्यांना मुंबईला बोलावले. मग मुख्यमंत्री तातडीने त्यांच्या मुलासह मुंबईच्या रुग्णालयात दाखल झाले. काही महिन्यांपूर्वी लिलावती रुग्णालयातच पर्रीकर यांनी स्वादूपिंडाशीसंबंधित आजारावर आठवडाभर उपचार घेतले होते. त्यानंतर ते पुढील उपचारांसाठी अमेरिकेला गेले होते.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी पणजीत वाजपेयी यांच्या अस्थींचे पणजीतील मांडवी नदीत विसजर्न केले जाईल, असे भाजपचे सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी मंगळवारी जाहीर केले होते. मात्र पर्रीकर आजारी पडल्याने त्यांच्या अनुपस्थितीत अस्थी विसजर्न करण्यात आले. पर्रीकर यांची प्रकृती आता सुधारली असून ते शनिवारी रात्री उशिरा देखील गोव्यात पोहचू शकतात असे सूत्रांनी सांगितले. पर्रीकर यांच्या काही महत्त्वाच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्याचे कळते. दरम्यान, गोव्याचे नगर विकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा हे अमेरिकेतच उपचारांसाठी गेले आहेत. विदेश दौऱ्यावर गेलेले कृषी मंत्री विजय सरदेसाई हे शनिवारी परततील.