पणजी : तीन महिने अमेरिकेत उपचार घेतल्यानं गुरुवारी गोव्यात दाखल झालेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी माशेल व पणजी येथील मंदिरांना भेटी देऊन देवदर्शन घेतले. शेकडो भाजपा समर्थक व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. ऑल द बेस्ट भाई, असे म्हणत कार्यकर्त्यांनी त्यांना दूरूनच हात दाखवला. 14 फेब्रुवारीला पर्रीकर यांच्या प्रकृतीत बिघाड झाला होता. यानंतर अमेरिकेत ते उपचार घेत होते. अमेरिकेहून 14 जून रोजी ते पणजीत परतले. पर्रीकर यांना स्वादूपिंडाशीसंबंधित गंभीर आजार झाला होता. त्यावर यशस्वी उपचार झाल्याने पर्रीकर आणि भाजपाही समाधानी आहे. पर्रीकर यांनी प्रथम त्यांची कुलदेवता असलेल्या माशेल येथील पिसो रवळनाथ मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत त्यांचे मोठे पुत्र यावेळी होते.
गोवा विधानसभेचे सभापती डॉ. प्रमोद सावंत हेही येथे उपस्थित राहिले. मग पर्रीकर हे पणजीतील ग्रामदैवत असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात आले. यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. शिवाय पणजीतील शेकडो भाजपा कार्यकर्ते व पर्रीकर यांचे समर्थक तसेच काही व्यवसायिक, उद्योजक वगैरे जमले होते. पर्रीकर यांनी लोकांशी फक्त स्मितहास्य केले. त्यांनी जास्त बोलण्याचे कष्ट घेतले नाही. त्यांनी महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले. एक प्रदक्षिणा काढली व तीर्थ, प्रसाद घेऊन ते या मंदिराच्या परिसरात असलेल्या अन्य देऊळांमध्ये गेले.
पर्रीकर हे उपचारांमुळे थोडे थकलेले असले तरी त्यांचा चेहरा प्रसन्न आहे. ऑल द बेस्ट भाई, असे कार्यकर्ते त्यांना म्हणू लागले तेव्हा ते थोडे भावूकही झाले. पणजीतील अनेक आजी-माजी नगरसेवक यावेळी उपस्थित होते. दरम्यान, विधानसभा सभापती डॉ. सावंत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की मुख्यमंत्र्यांना गोमंतकीयांनी थोडा वेळ द्यावा. पर्रीकर चौदा तासांचा विमान प्रवास करून अमेरिकेहून आले आहेत. प्रशासकीय अडचणी दूर करून गोव्याचे प्रशासन पुन्हा एकदा जोरात पुढे नेण्यासाठी सर्वानीच पर्रीकर यांना थोडा वेळ द्यायला हवा. गोवा विधानसभा अधिवेशनाची तारीख आज- उद्या मुख्यमंत्री ठरवतील.