पणजी - मुंबईमधील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर बुधवारी (29 ऑगस्ट) संध्याकाळी पुढील उपचारांसाठी अमेरिकेत जाणार आहेत. आज सायंकाळी ते अमेरिकेस रवाना होतील याची कल्पना मंत्र्यांना देण्यात आली आहे. मुख्यमंत्री पर्रीकर 22 जुलैला सायंकाळी अमेरिकेहून अकरा दिवसांचे उपचार घेऊन गोव्यात परतले होते. न्यूयॉर्कमधील ‘स्लोन केटरिंग केन्सर ’ स्मृती रुग्णालयात ते उपचार घेत होते. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र उत्पल पर्रीकर आणि गोमेकॉचे डॉक्टर कोलवाळकर हेही अमेरिकेला गेले होते.
मुख्यमंत्र्यांनी गोव्यात परतल्यानंतर विश्रांती घेणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी विश्रांती घेतली नाही. दाबोळी विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश भाजपा नेत्यांकडून हाती घेतला व ते लोकांच्या गर्दीत सहभागी होऊन अर्धा किलोमीटर चालत गेले. दुसऱ्या दिवशी त्यांना कोन्सटीपेशन झाले. तसेच उलटी होऊन अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पर्रीकर शनिवारी किंवा रविवारी गोव्यात परतणार होते. मात्र नंतर ते बुधवारी गोव्यात पोहोचतील असे मुख्यमंत्री कार्यालया तर्फे कळवण्यात आले होते. मात्र आज त्यात पुन्हा बदल झाला असून मुख्यमंत्री आज सायंकाळी अमेरिकेस जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याविषयी वारंवार समस्या निर्माण होत आहे.