पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालयातून मंगळवारी किंवा उद्या बुधवारी डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता आहे. पर्रीकर यांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यास हरकत नाही असे डॉक्टरांचे मत बनले असल्याची माहिती मिळाली आहे.
पर्रीकर यांना गेल्या आठवड्यात गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालयात रात्रीच्यावेळी तातडीने दाखल करावे लागले होते. त्यांच्या पोटात रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे दिल्लीतील एम्स रुग्णालयातील दोन तज्ज्ञ डॉक्टरांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालयात बोलवून घ्यावे लागले होते. दोन्ही डॉक्टरांनी पर्रीकर यांची पूर्ण तपासणी केली. पर्रीकर यांचा रक्तस्त्राव बंद झाला. सभापती प्रमोद सावंत यांच्या मते पर्रीकर यांना रक्ताची उलटीही झाली होती. त्याबाबतही डॉक्टरांकडून उपाययोजना करण्यात आली. पर्रीकर यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर एम्सचे डॉक्टर निघून गेले. पर्रीकर यांना मंगळवारी दुपारी डिस्चार्ज दिला जाईल, असे अगोदर सांगण्यात आले होते. मात्र मंगळवारी दुपारी शक्य नाही. सायंकाळपर्यंत डिस्चार्ज दिला जाईल किंवा उद्या सकाळी त्यांना घरी पाठविले जाईल, असे पर्रीकर यांच्या जवळच्या सुत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या स्थितीविषयी सातत्याने आरोग्य मंत्री विश्वजित राणे हे निवेदने जारी करत आहेत. रुग्णालयातील पर्रीकर यांच्या खोलीत जास्त कोणालाच प्रवेश नाही. भाजपाच्या काही मंत्री व आमदारांनाही सोमवारी पर्रीकर यांना न भेटताच रुग्णालयातून माघारी जावे लागले. पर्रीकर खूप कमी बोलतात. डॉक्टरांनी सुद्धा गुप्तता पाळली आहे. आरोग्य मंत्री या नात्याने विश्वजित राणे तेवढे आत जातात. त्यांच्याही भेटीचे प्रमाण कमीच आहे. विश्वजित राणे यांनी मंगळवारी सकाळीही रुग्णालयाला भेट दिली व डॉक्टरांशी चर्चा केली.