लोकमत न्यूज नेटवर्क. पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल दिल्लीत गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेतली व गोव्यातील राजकीय स्थिती त्यांच्यासमोर ठेवली. मंत्रिमंडळाची फेररचना सध्या होणार नाही किंवा आलेक्स सिक्वेरा यांना तातडीने मंत्रिमंडळात घेण्याचाही सध्या निर्णय झालेला नाही, हे मुख्यमंत्र्यांच्या कालच्या भेटीतून स्पष्ट झाले.
'लोकमत'ने मुख्यमंत्री सावंत यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. सध्या सरकारने पूर्णपणे आगामी विधानसभा अधिवेशनावर लक्ष केंद्रित केले आहे. मंत्रिमंडळातून कुणाला डच्चू देणे किंवा एखाद्या आमदाराला मंत्रिमंडळात घेणे असा सध्या प्रस्ताव नाही, असे मुख्यमंत्र्यांनी लोकमतला सांगितले.
मुख्यमंत्री प्रथम बी. एल. संतोष यांना भेटले. लोकसभा निवडणुकाजवळ येत असल्याने गोवा भाजप कशा प्रकारे तयारी करील याविषयी मुख्यमंत्र्यांनी संतोष यांना सांगितले. राज्यातील व मंत्रिमंडळातील सध्याची स्थिती याबाबतही सावंत यांनी त्यांना माहिती दिली. नंतर जे. पी. नड्डा व गृहमंत्री शाह यांच्याशी चर्चा झाली.
दरम्यान, गेल्या सप्टेंबरमध्ये काँग्रेसमधून फुटलेल्या आठ आमदारांपैकी काहीजणांना महामंडळे देऊन सरकारने खूश करण्याचा प्रयत्न केला. परंतु, आलेक्स सिक्वेरा, दिगंबर कामत आदी ज्येष्ठ आमदारांना अद्याप काही मिळालेले नाही. या दोघांची मंत्रिपद देण्यात येईल, अशी चर्चा होती त्याला तूर्त विराम मिळाला आहे.
प्रशासन तुमच्या दारी
'प्रशासन तुमच्या दारी या उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्र्यांसह सर्व १२ मंत्री संबंधित तालुक्यांमधील उपजिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत उपलब्ध असतील. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे स्वतः केपे येथे असतील.
सांगे- विश्वजित राणे, सत्तरी माविन गुदिन्हो, तिसवाडी- रवी नाईक, काणकोण नीलेश काब्राल, पेडणे- सुभाष शिरोडकर, सासष्टी - रोहन खंवटे, मुरगाव- गोविंद गावडे, फोंडा-बाबूश मोन्सेरात, बास- सुदिन ढवळीकर, धारबांदोडा- निळकंठ हळर्णकर डिचोली- सुभाष फळदेसाई याप्रमाणे मंत्री आज लोकांची गान्हाणी ऐकतील. संबंधित मतदारसंघांच्या आमदारांनाही निमंत्रित केले आहे.
शनिवारी (दि. (१८) स्वयंपूर्ण मित्र, गोवा नागरी सेवा आणि आयएएस अधिकारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत सर्व १९१९ ग्रामपंचायती आणि नगरपालिकांना भेट देणार आहेत. लोकांनी आपल्या अडीअडचणी, समस्या मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांकडे मांडावयाच्या आहेत.
मुख्यमंत्र्यांचा गौरव
दिल्लीतील एका समारंभात राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठातर्फे मुख्यमंत्री सावंत यांना फैलोशिप प्रदा करून गौरव करण्यात आला.
आपण आगामी विधानसभा अधिवेशनावर लक्ष केंद्रित केले आहे. मंत्रिमंडळातून कुणाला डच्चू देणे किंवा एखाद्या आमदाराला मंत्रिमंडळात घेणे असा सध्या निर्णय नाही. आपण गोव्यातील राजकीय स्थिती केंद्रीय नेतृत्वासमोर ठेवली आहे. - मुख्यमंत्री प्रमोद सावंत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"