किशोर कुबल/पणजी: अयोध्येतील श्री राम मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त गोव्यात ठिकठिकाणी मंदिरांमध्ये सकाळपासूनच धार्मिक विधी सुरु झाले आहेत. राज्यात सर्वत्र भक्तिभावाने भारलेले राममय वातावरण आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सकाळी त्यांच्या साखळी विधानसभा मतदारसंघात सपत्निक विविध मंदिरांना भेट देऊन देवदर्शन घेतले व पुजा, प्रार्थना व इतर धार्मिक विधी केले. दुपारी अयोध्येत राम मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना झाली तेव्हा गोव्यातील मंदिरांमध्येही रामनामाचा जयघोष करण्यात आला राम नामाचा जप अखंड चालू होता तसेच महाआरती, भजने, कीर्तनेही झाली.
सायंकाळी दिंड्या, शोभायात्राही होणार आहेत. राज्य सरकारने आज सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याने भाविकांची मंदिरांमध्ये गर्दी दिसून आली. देवदर्शनासाठी अनेक मंदिरांमध्ये रांगा लागल्या होत्या. राजधानी शहरात भाटलेतील तसेच कोलवाळ, पर्वरी वडेश्वर, गिमोणे-काणकोण तसेच इतर ठिकाणच्या राम मंदिरांमध्ये मोठी गर्दी होती.
श्री राम ज्योती प्रज्वलित करण्याचा शासकीय पातळीवरील प्रमुख कार्यक्रम आज सोमवारी सायंकाळी ६ वाजता पर्वरी येथे एससीईआरटी इमारतीजवळ होणार आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी राज्यात सर्वत्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे.