लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : जबाबदार पर्यटनासाठी सरकार कटिबद्ध आहे. कोविड महामारीनंतर काही गोष्टी प्रकर्षाने पुढे आल्या आहेत. त्यामुळे लवचिक पद्धतीचा अवलंब करावा लागेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यानी केले.
जी-२० पर्यटन कार्यगटाच्या गोव्यात चालू असलेल्या बैठकीचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. जागतिक स्तरावर देशात सर्वांत सुरक्षित पर्यटनस्थळ असल्याचा मान गोव्याला मिळाला आहे. पर्यटनात नवनवीन उपक्रम आणून ते लोकाभिमुख करण्याचे प्रयत्न सरकार करील, असे मुख्यमंत्री म्हणाले. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की, पर्यटनात सुधार आणण्यासाठी 'गोवा रोडमॅप' विशेष उपयुक्त ठरणार आहे.
यावेळी केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी, पर्यटन राज्यमंत्री अजय भट्ट, श्रीपाद नाईक व राज्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी युवा टूरिझम क्लबचे सदस्य असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. खंवटे म्हणाले की, विद्यार्थी शक्ती समाजासाठी नेहमीच स्फूर्ती देणारी आहे. विद्यार्थ्यांनी पर्यटन उपक्रमात सरकारला समस्या सोडविण्यात हातभार लावावा. केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना त्यांच्या सूचना मांडण्याची संधी दिलेली आहे, तेव्हा त्यांनी या सूचना मांडाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
५० संस्थांत टूरिझम क्लब
राज्यात ५० शैक्षणिक संस्थांकडे सरकारने हातमिळवणी केली असून, टूरिझम क्लब स्थापन केले जातील. खंवटे पुढे म्हणाले की, सरकार एकटे सर्व काही करू शकत नाही. इतरांचेही योगदान हवे. केंद्र सरकारच्या 'स्वदेश दर्शन', 'मिनी प्रसाद' योजनेंतर्गत पर्यटन उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी बराच वाव असल्याचे ते म्हणाले.
मरिना प्रकल्पावर एमपीटी ठाम : चेअरमन
मरिना प्रकल्पाबद्दल एमपीटी ठाम असल्याचे स्पष्ट झाले. जे कोणी विरोध करीत आहेत त्यांना समजावून विरोध दूर करू, असे एमपीटीचे चेअरमन डॉ. एन. विनोदकुमार यांनी स्पष्ट केले. सुपरयॉट मरिना डॉक येणार, असे ते एका प्रश्नावर म्हणाले. मरिना प्रकल्प म्हणजे बोटींसाठी केवळ हंगामी व्यवस्था आहे. लोकांकडे आम्ही बोलू, असे ते म्हणाले. दरम्यान, बंदरात आंतरराष्ट्रीय कुझ टर्मिनल येईल. येत्या नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये काम पूर्ण होईल आणि मार्च २०२४ पर्यंत ते कार्यान्वित होईल, असे विनोदकुमार म्हणाले. देश, विदेशी कुझ लायनर जहाजांना गोव्यात येण्याचा मार्ग यामुळे सुलभ होईल. मुरगाव बंदरातून लवकरच रो रो सेवा सुरू केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.