- नारायण गावस पणजी - राज्यात यंदा नवीन वर्षाच्या हंगामात पर्यटकांची संख्या कमी जाणवली. गेल्या वर्षी २०२२ च्या तुलनेत यंदा देश विदेशातील पर्यटकांची संख्या कमी आहे. गाेव्यात पर्यटनाविषयी केली जाणारी बदनामी, वाढत्या कोराेनाच्या तक्रारी, तसेच वाढती महागाईचा, विदेशात होत असलेली युद्धे याचा फटका यंदा पर्यटन व्यावसायावर बसला असे काही हॉटेल व्यावसायिक तसेच पर्यटनाशी निघडीत व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
एरव्ही डिसेंबरमध्ये नवीन वर्ष नाताळाला राज्यात पर्यटकांची माेठ्या प्रमाणात गर्दी असते. नाताळ नंतर पूर्ण आठवडा नवीन वर्ष येईपर्यंत पर्यटक राज्यात राहतात. यंदा डिसेंबरचा शेवटच्या आठवड्यात तेवढी पर्यटकांची गर्दी जाणवली नाही. पर्यटक आले पण जास्त प्रमाणात आले नाही. राज्यात जी काही वर्षापूर्वी नवीन वर्षाची क्रेझ होती. ती यंदा पहायला मिळाली नाही. जे कुटुंबासाेबत पर्यटक येत होते. त्यांच्यामध्ये कुठेतरी कमतरता जाणवली आहे. त्यामुळे यंदा पर्यटन व्यावसायाशी निघडीत असलेल्या काही व्यावसायिकांना फटका बसला.
काेरोना व अपप्रचाराचा फटका : जॉन डिकोस्टाराज्यात पुन्हा कोराेना रुग्ण वाढत आहे. देशभर सध्या कोराेनाचे रुग्ण वाढत असल्याने पर्यटक राज्यात येणे कमी केले. २०२० व २०२१ मध्ये कोराेनामुळे राज्यात पर्यटकांची संख्या कमी होती. नंतर २०२२ मध्ये पर्यटकांनी माेठी गर्दी केली होती. सर्व हॉटेल भरले होते. पण यंदा पर्यटकांची पुन्हा कमतरता जाणवली. तसेच राज्याच्या पर्यटना विषयी काही लाेकांनी नकारात्मक प्रसिद्धी केली आहे. पर्यटकांवर हाेत असलेले हल्ले त्यांची लुबाडणूक याला कारणीभूत आहे, असे वागातोर येथील हॉटेल व्यावसायिक जॉन डिकाेस्टा यांनी सांगितले.
पुढील दिवसात पर्यटक वाढणार : निलेश शाहगेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पर्यटकांची संख्या थोडी कमी आहे. सध्या रशिया युक्रेन तसेच अन्य देशात होत असलेल्या युद्धामुळे विदेशी पर्यटकांची संख्या कमी आहे. पण पुढील काही दिवसात राज्यात पर्यटक पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. आता लग्न साेहळ्यासाठी हॉटेल बुकींग झाले आहेत, असे टुर ॲण्ड ट्रव्हल गोवा असोसिएशनचे अध्यक्ष निलेश शाह यांनी सांगितले.