वास्को: यंदा पूर्ण ‘इंडियन सुपर लीग’ (आयएसएल) फुटबॉल स्पर्धा गोव्यात होणार असून याकाळात लागणाऱ्या विविध सेवेंचा व्यवसाय गोवेकरांना न देता बाहेरील व्यवसायिकदारांना दिल्याच्या विरोधात बुधवारी (दि.१८) गोवा कॉग्रेस समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दक्षिण गोव्यातील ‘नागोवा’ फुटबॉल मैदानाच्या बाहेर आंदोलन छेडले. यामैदानावर ‘मुंबई सीटी’ संघ उत्तरप्रदेश येथे नोंद असलेल्या बसमधून सराव करण्यासाठी आले असता त्या बसला कॉग्रेस पदाधिकाऱ्यांनी दोन तास अडवून खेळाडूंना सराव करण्यासाठी न देता बसला येथून परतून लावले.२० नोव्हेंबरपासून गोव्यात यास्पर्धेला सुरवात होणार आहे. स्पर्धेच्या काळात लागणाऱ्या बस, टॅक्सी, जनरेटर इत्यादी सेवेंचा व्यवसाय गोवेकरांना देण्यात यावा अशी मागणी काही दिवसापूर्वी कॉग्रेस समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. असे असताना सुद्धा बस, टॅक्सी इत्यादी सेवा बाहेरील व्यवसायिकदारांना दिल्याचे समजताच बुधवारी संध्याकाळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी याच्याविरोधात आंदोलन छेडले. नागोवा मैदानावर यास्पर्धेत खेळणार असलेला ‘मुंबई सीटी’ संघ उत्तरप्रदेश येथे नोंद असलेल्या बसमधून तसेच काही प्रतिनिधी दिल्ली येथे नोंद असलेल्या वाहनातून आल्याचे कॉग्रेस पदाधिकाऱ्यांना दिसून येताच ही वाहने त्यांच्याकडून अडवण्यात आली. मागील आयएसएल स्पर्धेत गोव्यात होणाऱ्या सामन्यावेळी लागणाऱ्या टॅक्सी, बसेस, जनरेटर इत्यादी सेवा गोव्यातील व्यवसायिकदारांकडून घेण्यात येत होत्या, मात्र यंदा त्या बाहेर का देण्यात आल्या आहेत असा सवाल येथे उपस्थित असलेल्या आयोजकांच्या प्रतिनिधींना करण्यात आला. स्पर्धा आयोजित करताना गोव्यातील सर्व साधन सुविधेंचा वापर करण्यात येणार असून व्यवसाय बाहेरील राज्यातील लोकांना का असा सवाल कॉग्रेस नेत्यांनी उपस्थित केला. आयएसएल स्पर्धा खेळविताना गोव्यातील व्यवसायिकदारांच्या सेवा घेतल्या नसल्यास आम्ही ही स्पर्धा होऊ देणार नसल्याचे आंदोलकांनी यावेळी स्पष्ट केले.आंदोलनावेळी येथे अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीसांनी कडक सुरक्षा लावली होती. तसेच आयोजकांच्या प्रतिनिधींनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले, मात्र जोपर्यंत यास्पर्धेच्या दरम्यान येथील व्यवसायिकदारांच्या सेवा घेणार असल्याचे आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प राहणार नसल्याचे काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसने ठेवलेल्या मागणीवर चर्चा करून योग्य निर्णय घेण्यासाठी गुरूवारी काँग्रेस समिती व आयएसएल आयोजक प्रतिनिधींची बैठक ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर बुधवारी पुकारलेले आंदोलन मागे घेण्यात आले. काँग्रेसने गोवेकर व्यवसायिकदारांच्या हीतासाठी ठेवलेल्या मागणीवर चर्चा करण्यासाठी गुरूवारी आयोजकांनी काँग्रेस समितीशी बैठक ठेवल्याची माहीती काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी नंतर पत्रकारांना दिली. याबैठकीत स्पर्धेच्या काळात लागणाऱ्या विविध सेवा गोवेकरांना देण्याची मागणी आयोजक मान्य करणार असल्याचा विश्वास आमोणकर यांनी व्यक्त केला. आम्ही या स्पर्धेच्या विरोधात मूळीच नाहीत, मात्र ही स्पर्धा आयोजित करताना लागणाऱ्या सेवेंचा व्यवसाय गोमंतकीयांना दिला नसल्यास यास्पर्धेला आम्ही अडथळा निर्माण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बुधवारी पुकारलेल्या या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस जनार्धन भंडारी, सरचिटणीस अमरनाथ पणजीकर, युवा अध्यक्ष वरद म्हार्दोळकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
गोवेकरांना व्यवसाय दिला नसल्याने ‘इंडियन सुपर लीग’च्या विरोधात गोवा काँग्रेसने पुकारले आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 9:53 PM