काँग्रेसमधील कलहाचे ग्रहण सुटेना!
By किशोर कुबल | Published: September 3, 2023 10:31 AM2023-09-03T10:31:04+5:302023-09-03T10:32:01+5:30
कोण खरे, कोण खोटे? काँग्रेसची अशी फरफट का चालली आहे?
- किशोर कुबल
काँग्रेसच्या युवा ब्रिगेडमधील फायरब्रॅण्ड नेते जनार्दन भंडारी तसेच अन्य चौघे मिळून पाच नेत्यांवर पक्षशिस्तीचा बडगा उगारून केलेली निलंबनाची कारवाई प्रदेशाध्यक्षांना मागे घ्यावी लागली. लेखी माफीनामा दिल्याने निलंबन मागे घेतल्याचे प्रदेशाध्यक्ष सांगतात; तर असा कोणताही माफीनामा दिला नसल्याचे हे पाचहीजण सांगतात. कोण खरे, कोण खोटे? काँग्रेसची अशी फरफट का चालली आहे?
जनार्दन भंडारी, खेमलो सावंत, प्रदीप नाईक, ग्लेन काब्राल व महेश म्हांबरे या पाचजणांना प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी निलंबित केल्याचे प्रकरण बरेच गाजले. पाटकर प्रदेशाध्यक्ष बनल्यापासून पक्षात बरीच धुसफूस सुरू आहे. या पाच जणांनी तर त्यांच्याविरुद्ध उघडपणे बंड केले.
पक्षशिस्तीचा बडगा उगारून निलंबनाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई का केली, यामागेही मोठी कथा आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत पर्वरी मतदारसंघातून काँग्रेसतर्फे रिंगणात उतरलेले विकास प्रभुदेसाई यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. शिवकुमार यांची सदिच्छा भेट घेतली. गोवा व कर्नाटक यांच्यात म्हादईच्या प्रश्नावरून आधीच संबंध बिघडलेले असताना प्रभुदेसाई यांनी स्थानिक नेत्यांना अंधारात ठेवून शिवकुमार यांची भेट घेतल्याने त्यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली. प्रभुदेसाई यांना का नोटीस बजावली? अशी विचारणा करण्यासाठी वरील पाचजण प्रदेशाध्यक्षांकडे गेले असता तेथे बाचाबाची झाली. काँग्रेसचा एक गट पाटकर यांच्या विरोधात आहे.
प्रदेशाध्यक्षांबद्दल वरचेवर त्यांच्या तक्रारी असतात. हा गट माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा समर्थक असल्याची चर्चा नेहमीच असते. योगायोगाने वरील पाचजण चोडणकर यांना निकट आहेत. जर्नादन भंडारी हे राहुल गांधीनाही भेटले. त्यानंतर गेल्याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षांना दिल्लीला बोलावून घेण्यात आले. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस वेणुगोपाल यांनी गिरीश चोडणकर, आमदार कालुस फेरेरा यांच्याशी चर्चा केली, त्यानंतर या पाचही जणांचे निलंबन मागे घेण्याचे निर्देश दिल्याची चर्चा आहे.
प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी मात्र हे वृत्त फेटाळून लावताना असे म्हटले आहे की, पाचही जणांनी चूक मान्य करून माफीपत्र दिलेले आहे. त्यामुळे निलंबन मागे घेतले. काँग्रेस पक्ष लोकशाही मानणारा पक्ष आहे. बेशिस्त वागल्याने त्यांना निलंबित केले होते. त्यांची चूक त्यांना उमगली आणि माफीनामाही दिला, त्यामुळे निलंबन हटवले. यापुढे पुनरावृत्ती नको, अशी समजही दिली आहे.'
प्रदेशाध्यक्षांविरुद्ध जनार्दन भंडारी, खेमलो सावंत, प्रदीप नाईक यांनी उघडपणे बंड केले. खेमलो यांचे असे म्हणणे आहे की, प्रदेशाध्यक्षांनी आम्ही माफीनामा लिहून दिल्याचा जो दावा केला आहे, तो खोटा आहे. प्रदेशाध्यक्ष आम्हाला काम करू देत नाहीत. सरकारच्या एखाद्या कार्यालयावर धडक देऊन आम्ही आंदोलन केले तर अडवतात. म्हणून मी पक्ष प्रभारीकडेही जाहीरपणे तक्रार केली होती. पक्ष शिस्तीचा भंग होईल, असे आम्ही काहीही केलेले नाही. काही केले असते तर कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्या कॅमेऱ्यांमध्ये सगळे सत्य कैद झालेले असते. हवे तर कॅमेरे तपासा, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी पाटकर यांना प्रदेशाध्यक्षपदावरून दूर न केल्यास येत्या निवडणुकीत काँग्रेसला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे आपण प्रभारींना सांगितल्याचे खेमलो सांगतात. खेमलो म्हणतात, पाटकर यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत जिल्हा •पंचायतीच्या चार मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका झाल्या, तसेच साखळी व फोंडा पालिकांच्या निवडणुका झाल्या; परंतु काँग्रेसला या निवडणुकांमध्ये अपयश आले. लोकसभा निवडणुकीआधी प्रदेशाध्यक्ष बदलला नाही तर काही खैर नाही.
जुलैमध्ये भर पावसात पक्षाचे गोवा प्रभारी माणिकम टागोर येऊन गेले. काहीजणांनी त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रारी केल्या. वरील पाचजणांबरोबरच पर्वरीतील विधानसभा उमेदवार विकास प्रभुदेसाई यांनीही प्रदेशाध्यक्षांविरुद्ध पाढा वाचला. परंतु त्यावेळी प्रदेशाध्यक्ष बदलणार नाही, असे प्रभारींनी ठामपणे सांगितले. पाटकर यांची नियुक्ती राहुल गांधी यांनी केल्याचे नमूद करून या घडीला नवा अध्यक्ष दिला जाऊ शकत नाही, असे टागोर यानी स्पष्ट केले होते. त्यानंतर बंड पुन्हा उफाळून आले.
प्रदीप नाईक यांनीही सोशल मीडियावर पोस्ट टाकून प्रदेशाध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त होती. अमित पाटकर पक्षाच्या हितासाठी काम करत आहेत का, हे आता जनतेनेच ठरवायचे आहे, असे त्यांनी म्हटले होते. यावरून पक्षातील अंतर्गत संघर्ष किती तीव्र आहे, याची कल्पना येते.
पूर्वी सरकारविरोधात कार्यालयांमध्ये घुसून जशी आंदोलने काँग्रेस कार्यकर्ते करीत होते. ती आता दिसत नाहीत. जना भंडारी काणकोणमध्ये एक हाती पक्षाचा कारभार सांभाळत आहेत. रस्त्यांवरील खड़े असोत, पाणी समस्या अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील दुरावस्था, जना आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन सरकारी कार्यालयांवर धडक देत असतात.
मध्यंतरी प्रदेशाध्यक्षांनी राष्ट्रीय अध्यक्ष निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसतर्फे ३१ प्रतिनिधी निवडले. त्यात काही ज्येष्ठ कार्यकर्ते, नेते यांना डावलल्याने काँग्रेसमध्ये वादळ उठले. ३१ जणांमध्ये बहुतांश प्रतिनिधी विद्यमान प्रदेशाध्यक्षांना निकट असलेलेच होते. गिरीश यांच्या गोटातील जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची भावना पक्षात निर्माण झाली.
गिरीश यांच्या अलीकडे दिल्लीवाऱ्या वाढल्या होत्या. त्यामुळे ते परत प्रदेशाध्यक्षपदी येतात की काय असा कयास व्यक्त केला जात होता. परंतु चोडणकर यांना केंद्रीय नेत्यांनी बढ़ती देऊन अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीवर कायम निमंत्रित म्हणून नेले आहे. त्यामुळे या विषयाला पूर्णविराम मिळाला आहे. परंतु निलंबन मागे घेतले म्हणून काँग्रेसमधील धुसफूस मात्र संपलेली नाही. अंतर्गत कलहाचे ग्रहण या पक्षाच्या पाचवीलाच पुजलेले आहे. ते कधी सुटते पाहू
प्रदीप नाईक यांनीही सोशल मीडियावर पोस्ट टाकून प्रदेशाध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अमित पाटकर पक्षाच्या हितासाठी काम करत आहेत का, हे आता जनतेनेच ठरवायचे आहे, असे त्यांनी म्हटले होते. यावरून पक्षातील अंतर्गत संघर्ष किती तीव्र आहे, याची कल्पना येते.
पूर्वी सरकारविरोधात कार्यालयांमध्ये घुसून जशी आंदोलने काँग्रेस कार्यकर्ते करीत होते. ती आता दिसत नाहीत. जना भंडारी काणकोणमध्ये एक हाती पक्षाचा कारभार सांभाळत आहेत. रस्त्यांवरील खड्डे असोत, पाणी समस्या अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील दुरावस्था, जना आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन सरकारी कार्यालयांवर धडक देत असतात.