'ऑपरेशन कमळ फेल'! महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यातही पक्ष फोडण्याचा होता भाजपचा डाव, काँग्रेसचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 11:34 AM2022-07-12T11:34:49+5:302022-07-12T11:35:42+5:30
"भाजपचे ऑपरेशन कमळ अयशस्वी झाले आहे. त्यांनी प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही."
गोवाकाँग्रेसवर आलेले संकट अद्याप संपलेले नाही. मात्र, यातच, 'फ्लॉप ऑपरेशन कमाळ', असे म्हणत पक्षाचे राज्य प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर थेट निशाणा साधला आहे. याशिवाय, त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते दिगंबर कामत यांच्यावरही मोठे आरोप केले. पक्षाचे काही मुख्य नेते रविवारी संपर्काबाहेर गेले होते. यामुळे ते पक्षांतर करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जात होती.
न्यूज18 सोबत बोलताना राव म्हणाले, 'आमच्याशी एकनिष्ठ असलेले कोण आणि पक्षांतर करणारे कोण? हे आम्हाला माहीत आहे. भाजपने आणखी एक प्रयत्न केला, पण तो सपशेल अयशस्वी ठरला. दबाव असूनही आमचे तरुण आणि प्रथमच निवडून आलेले आमदार सोबत आहेत. गेल्या महिनाभरापासून हे कारस्थान सुरू होते.'
राव यांनी आरोप केला, की आमदारांवर खदान, कोळसा आणि उद्योगांसह अनेक ठिकाणांवरून दबाव टाकण्यात आला. एवढेच नाही, काँग्रेसकडे 7 आमदार आहेत, अशी पुष्टीही राव यांनी केली आहे. याच बरोबर चार नेते पक्षासोबत नाहीत, असेही राव यांनी म्हटले आहे. यांत मायकल लोबो, दिगंबर कामत, केदार नाईक आणि डेलिलाया लोबो यांचा समावेश आहे. तसेच, 'मंत्र्यांना आकर्षित करण्यासाठी भाजप किती खआलच्या पातळीवर उतरली आहे, हे लज्जास्पद आहे,' असेही राव यांनी म्हटले आहे.
राव म्हणाले, "भाजपचे ऑपरेशन कमळ अयशस्वी झाले आहे. त्यांनी प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. खरे तर, भाजपने महाराष्ट्राप्रमाणेच पक्षाचे दोन तृतीयांश आमदार फोडून आपली संख्या 25 वरून 33 वर नेण्याची योजना आखली होती. असे झाले असते, तर भाजपची संख्या 40 पैकी 33 एवढी झाली असती आणि ते विरोधी पक्ष मुक्त झाले असते." एवढेच नाही, तर काँग्रेस आमदारांशी संपर्क साधणारे भाजप नेते त्यांच्यासोबत केवळ पैशांसंदर्भातच बोलले नाही, तर त्यांना ईडी आणि आयकरच्या रेडची धमकीही दिली, असा आरोपही राव यांनी केला.