लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवून काही तासच उलटले असताना एल्विस गोम्स यांनी पक्षाच्या दिशाहिन कारभारावर आसूड ओढत आपल्याविरुध्द पक्षातच कट कारस्थान चालू असल्याचा आरोप केला आहे.
चार दिवसांपूर्वी पक्षाच्या स्क्रीनिंग कमिटीची बैठक मडगाव येथे झाली. कमिटीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्री यांनी इच्छुक उमेदवारांना बोलावून 'वन टू वन चर्चा केली. परंतु एल्विस याना बोलावले नाही. त्यामुळे ते कमालीचे नाराज होते.
मनातील खदखद व्यक्त करताना एल्विस म्हणाले की, राज्यात काँग्रेसचा कारभार दिशाहिन झालेला आहे. निवडणूक लढविण्याची इच्छा बोलून दाखवूनही मला मुद्दामहून छाननी समितीच्या बैठकीला डावलले. माझ्याविरुध्द पक्षातच कट कारस्थान चालू आहे.
दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे एल्विस यांनी याआधीच जाहीर केले होते. स्क्रिनिंग कमिटीची बैठक घेण्यासाठी आलेले मिस्री तसेच पक्षाचे नवनियुक्त प्रभारी माणिकराव ठाकरे यांना तिकिटासाठी इच्छुक असलेले विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन, गिरीश चोडणकर भेटले. परंतु एल्विस गोम्स काही आले नाहीत. नंतर त्यांनी आपल्याला कोणी भेटायला बोलावलेच नाही, असे पत्रकारांना सांगितले.
राहुलजींपर्यंत जाणार...
एल्विस म्हणाले की, स्क्रिनिंग कमिटीच्या बैठकीतून मला बाहेर ठेवल्यानंतर सोमवारी झालेल्या पक्षाच्या दक्षिण जिल्हा समितीच्या बैठकीत काही जणांनी प्रश्न उपस्थित केला व त्यानंतरच इच्छुकांकडून अर्ज मागवण्यात आले. मला बाजूला ठेवले जात असले तरी मी पक्षाबरोबर ठामपणे आहे. मला राहुल गांधींनी काँग्रेसमध्ये आणले आहे. मात्र, परिस्थितीत जर का सुधारणा झाली नाही तर मी माझे म्हणणे राहुलजींकडे मांडणार आहे, त्यानंतर काय तो निर्णय घेतला जाईल, असेही गोम्स यांनी यावेळी सांगितले.
तब्बल तीनवेळा पराभूत
एल्विस गोम्स यांना याआधी तीनवेळा पराभव पत्करावा लागला आहे, त्यामुळे कदाचित त्यांना डावलले जात असावे, असा अंदाज आहे. २०१९ साली त्यांनी आम आदमी पक्षाच्या तिकिटावर दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली त्यात त्यांचा पराभव झाला. त्याआधी २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत 'आप'ने त्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करीत कुंकळ्ळी मतदारसंघातून रिंगणात उतरवले. परंतु तेथेही त्यांचा पराभव झाला. फेब्रुवारी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसने पणजीतून उमेदवारी दिली. परंतु या निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला.
विधानसभा निवडणुकीच्याआधी गिरीश चोडणकर व दिगंबर कामत यांची सद्दी होती आता प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व त्यांच्या साथीदारांची आहे. दोन्ही गटांच्या कारभारात मला काहीच फरक जाणवलेला नाही. गोव्यात काँग्रेस दिशाहीन झाला आहे. एल्विस गोम्स, काँग्रेस नेते.