गोव्याचे माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 08:36 PM2020-04-21T20:36:21+5:302020-04-21T20:36:53+5:30
देशप्रभू यांची कारकीर्द काँग्रेस पक्षात सुरू झाली होती. पेडणे मतदारसंघातून ते दोनवेळा काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते.
पणजी : काँग्रेसचे नेते व माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांचे मंगळवारी सायंकाळी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात निधन झाले. ते 1999 साली निवडून पहिल्यांदा निवडून येऊन दोनवेळा गोवा विधानसभेचे सदस्य बनले होते. त्यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त कळताच राज्यभरातील अनेक लोकांनी व राजकीय नेत्यांनी दु:ख व्यक्त केले.
देशप्रभू यांची कारकीर्द काँग्रेस पक्षात सुरू झाली होती. पेडणे मतदारसंघातून ते दोनवेळा काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. विधानसभेतील मुलूख मैदानी तोफ अशी आपली प्रतिमा त्यांनी अल्पावधीत तयार केली होती. इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांवर त्यांचे जबरदस्त प्रभुत्व होते व दोन्ही भाषांमधून ते विधानसभेत व विधानसभेबाहेर बोलायचे. ते जमिनदार असले तरी, कितीही सामान्य व्यक्तीशी त्यांचा संवाद रंगायचा. त्यांना गायनाचीही आवड होती. इंग्रजीतील त्यांची अनेक भाषणे गोवा विधानसभेने 2000 सालच्या आरंभी ऐकली आहेत.
स्व. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रीपदी असताना काँग्रेसचे अवघेच आमदार जोरदारपणे भाजपाविरुद्ध बोलायचे. त्यात देशप्रभू अग्रस्थानी होते. भाजपाचे नेते व देशप्रभू यांच्यात अनेकदा संघर्ष व्हायचा. मात्र राज्यात काँग्रेसचे सरकार अधिकारावर असताना व दिगंबर कामत मुख्यमंत्रीपदी असताना देशप्रभू यांना 2011 च्या सुमारास बेकायदा खाण प्रकरणी अटक झाली होती. ते उच्च शिक्षित होते. त्यांनी एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही प्रवेश करून राष्ट्रवादीतर्फे उत्तर गोव्यातून लोकसभा निवडणूक लढवली होती. तथापि, त्यांचा पराभव झाला व मग ते काँग्रेस पक्षात परतले होते. एकेकाळी माजी मुख्यमंत्री लुईङिान फालेरो यांचे ते निकटवर्ती होते.
देशप्रभू यांना अस्वस्थ वाटू लागल्याने मंगळवारी दुपारीच उपचारांसाठी गोमेकॉ इस्पितळात आणण्यात आले होते. तिथे त्यांना व्हेंटिलेटरही ठेवले गेले. त्यांना न्यूमोनिया झाल्याने त्यांची कोरोना चाचणीही करून पाहिली गेली होती. त्या चाचणीचा अहवाल नकारात्मक आला. म्हणजे त्यांना कोरोना झाला नव्हता हे स्पष्ट झाले, असे गोमेकॉच्या डॉक्टरांनी सांगितले. मृत्यूसमयी देशप्रभू यांचे वय 63 होते. त्यांना धूम्रपानाची सवय होती.
बारा वर्षापूर्वी म्हणजे 2008 साली त्यांच्या तरुण मुलाचे कार अपघातात निधन झाले होते. त्यानंतरच्या काळातही त्यांना एक पुत्र प्राप्ती झाली. त्यामुळे ते खूश होते. त्यांच्या मागे त्यांची पत्नी व मुलगा असा परिवार आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी देशप्रभू यांच्या निधनाविषयी दु:ख व्यक्त केले.