पणजी: शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३५ हून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आठवडाभरापासून राज्यातील राजकीय संघर्ष पराकोटीला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. आठवडभरापासून वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेल्या भाजपने अखेर या राजकीय नाट्यात उडी घेत थेट राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना बहुमत चाचणीचे पत्र दिले. यानंतर आता सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीवरून गोव्याला येणार असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता गोवाकाँग्रेसने बंडखोर आमदारांशी संवाद साधणार असल्याचे म्हटले आहे.
राज्यातील राजकीय संघर्षाची चर्चा अवघ्या देशात आहे. महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कोसळणार का, बहुमत चाचणीला काय होणार याची प्रचंड उत्सुकता देशभरातील राजकीय वर्तुळात आहे. यातच एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीहून गोव्याला येत असल्याच्या वृत्तानंतर आता गोवाकाँग्रेसने महाराष्ट्रातील राजकीय संघर्षात उडी घेतली आहे.
बंडखोर आमदारांची भेट घेणार
बंडखोर आमदार गोव्यात आले की त्यांची भेट घेणार आहोत. त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तसेच या बंडखोर आमदारांचे मन वळवण्याचा प्रयत्न आम्ही करू, असा विश्वास गोवा काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी व्यक्त केला आहे. तत्पूर्वी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून धीर दिला. आम्ही सोबत आहोत, घाबरण्यासारखे काही नाही. वेळ आल्यास तुम्हाला बाहेरून पाठिंबा देऊ असेही सांगितले आहे. शिवसेनेत स्थिरता राहावी असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. २०१९ मध्ये लोकांनी आम्हाला जनतेने विरोधी बाकांवर बसण्याचं कौल दिला. परंतु त्यानंतर घडलेल्या घडामोडीत काँग्रेस सत्तेत आले, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.
दरम्यान, महाराष्ट्रातील जनतेला सुख समाधान आणि समृद्धीचे दिवस येवो, यासाठी आम्ही कामाख्या देवीकडे मागणे मागितले आहे. कामाख्या देवीचे दर्शन हे श्रद्धेचा विषय आहे. आपलं मागणं घेऊन सर्वच जण कामाख्या देवीकडे येतात आणि देवी त्यांना आशीर्वाद देतात, असे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे दर्शनानंतर म्हणाले. तसेच आम्ही मुंबईत आल्यावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आणि आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावर जाणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.