गोवा कॉंग्रेस अध्यक्षांची आरजी प्रमुखाविरुद्ध बदनामीची तक्रार
By वासुदेव.पागी | Published: November 9, 2023 04:29 PM2023-11-09T16:29:09+5:302023-11-09T16:29:32+5:30
पाटकर यांनी पणजी पोलीस स्थानकात मनोज परब यांच्या विरोधात नोंद केलेल्या तक्रारीत परब यांनी आपली जाहीरपणे बदनामी केल्याचा आरोप केला आहे.
पणजी: खाण घोटाळा प्रकरणावरील आरोपांची दखल घेऊन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी रिवोल्युशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब यांच्या विरुद्ध बदनामीची तक्रार पणजी पोलीस स्थानकात नोंदविली आहे.
पाटकर यांनी पणजी पोलीस स्थानकात मनोज परब यांच्या विरोधात नोंद केलेल्या तक्रारीत परब यांनी आपली जाहीरपणे बदनामी केल्याचा आरोप केला आहे. आपल्या तक्रारीची दखल घेऊन भारतीय दंड संहिता कलम ४९९ व ५०० अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्याची मागणी त्यांनी पणजी पोलिसांना केली आहे.
बुधवारी परब यांनी पाटकर यांच्या विरुद्ध गंभीर आरोप करताना ते खाण घोटाळ्यात गुंतल्याचे म्हटले होते. तसेच त्यांना खाण लिजांच्या इ ऑक्शनमध्ये सहभाी होण्यासाठी सवलतही मिळाली होती असा आरोपही त्यांनी केला आहे.
दरम्यान खाणींच्या मुद्यावरून पाटकर व परब यांच्यामध्ये एकमेकांवर जोरदार आणि गंभीर स्वरुपाचे आरोप होताना दिसत आहेत. गुरूवारी कॉंग्रेस हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पाटकर यांनी रिवोल्युशनरी गोवन्सचे नेतृत्व बेताल व बेजबाबदार वक्तव्ये करीत असल्याची टीका केली. त्यांचा तुकाराम परब असा उल्लेख करताना ते म्हणाला की परब यांनी आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. त्यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेण्यात आली असून पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच सर्व प्रकारच्या कायदेशीर कारवाईसाठी परब याला सामोरे जावे लागणार असल्याचे ते म्हणाले.