पणजी : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी गोव्यात सध्या सुट्टी एन्जॉय करत आहेत. यादरम्यान ते गोव्यातील खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेताना दिसत आहे. आई सोनिया गांधी यांच्यासोबत दक्षिण गोव्यातील किनारपट्टी परिसरात राहुल गांधी गोमंतकीय संस्कृती अनुभवत आहेत.
दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी गोव्यात दाखल झाले आहेत. राहुल गांधी अलिकडील काळात खासगी भेटीवर प्रथमच आले आहेत. गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी लोकमतला सांगितले की, राहुल गांधी हे विश्रांतीसाठी आलेले असल्याने आम्ही कुणीच त्यांना भेटलेलो नाही. कारण त्यांच्या विश्रांती काळात आम्ही व्यत्यय आणू इच्छित नाही.
राहुल गांधी यांनी केळशी मोबोर परिसरातील किनारपट्टी भागात असलेल्या एका रेस्टॉरंटला रविवारी दुपारी भेट दिली. एका गोमंतकीय महिला डॉक्टरने राहुल गांधी यांच्यासोबत फोटोही काढून घेतला आणि तो फेसबुकवर पोस्ट केला. राहुल गांधी यांनी खास गोमंतकीय पद्धतीचे मांसाहारी जेवण केल्याची माहिती समोर आली आहे. निळ्या टीशर्टमध्ये राहुल गांधी दिसून येत आहेत. दक्षिण गोव्यातीलच पंचतारांकित हॉटेलात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचे वास्तव्य आहे. येत्या 30 रोजी राहुल गांधी दिल्लीला रवाना होतील. सहा महिन्यांपूर्वी सोनिया गांधींसोबत प्रियंका गांधी गोव्यात विश्रांतीसाठी आल्या होत्या. सोनिया गांधी यांनी त्यावेळी ख्रिस्ती म्युझिअम आणि गोव्यातील काही मंदिरांना भेट दिली होती.
दरम्यान, योगायोगाने भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हेही गोव्यात आहेत. अडवाणी यांनी पणजीत झालेल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्य़ातही प्रथमच भाग घेतला. अडवाणी हे त्यांच्या मुलीसोबत दोनापावल येथील राजभवनवर राहिले आहेत. तेही बुधवारी गोव्याचा निरोप घेतील.