फॉर्मेलीनयुक्त मासळीच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक, शिष्टमंडळाचे मंत्र्यांना निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 02:46 PM2018-09-24T14:46:41+5:302018-09-24T14:47:53+5:30
गोव्यात आयात होणाऱ्या फॉर्मेलीनयुक्त मासळीच्या प्रश्नावर काँग्रेस शिष्टमंडळाने मच्छीमार मंत्री विनोद पालेकर यांना भेटण्यासाठी सोमवारी सकाळी तडक मंत्रालय गाठले.
पणजी : गोव्यात आयात होणाऱ्या फॉर्मेलीनयुक्त मासळीच्या प्रश्नावर काँग्रेस शिष्टमंडळाने मच्छीमार मंत्री विनोद पालेकर यांना भेटण्यासाठी सोमवारी (24 सप्टेंबर) सकाळी तडक मंत्रालय गाठले. परंतु आपण अपॉईंटमेंट देऊनही मंत्री उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे खात्याचे संचालक विनेश आर्लेकर यांच्याकडे निवेदन देऊन हे शिष्टमंडळ परतले.
दोन दिवसापूर्वी काँग्रेसने पुढाकार घेऊन मडगाव येथे फॉर्मेलीनयुक्त मासळी पकडली. त्यानंतर पक्षाच्या नेत्यांकडून सरकारवर अकार्यक्षमतेचे आरोप सुरू झाले. तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक तसेच अन्य राज्यांमधून गोव्यात आयात होणाऱ्या मासळीत फॉर्मेलीन वापरले जाते आणि ते मानवी आरोग्याला धोकादायक असूनही सरकार कारवाईबाबत कोणती पावले उचलत नाही असा काँग्रेसचा आरोप आहे. या प्रश्नावर पक्षाने मच्छीमारी मंत्री विनोद पालेकर यांची अपॉईंटमेंट मागितली होती.
सकाळी अकरा वाजता मंत्र्यांनी पर्वरी येथील मंत्रालयात भेटण्यासाठी या शिष्टमंडळाला अपॉईंटमेंट दिली होती. परंतु प्रत्यक्षात मंत्री काही फिरकलेच नाहीत. त्यांनी संचालक विनेश आर्लेकर यांना पाठवले. काँग्रेसने संचालकांकडे निवेदन सादर केले असून आयात मासळी तपासणी बाबत सरकारने कठोर पावले उचलावीत अशी मागणी केली आहे. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, सांताक्रुजचे आमदार टोनी फर्नांडिस, उत्तर जिल्हा अध्यक्ष विजय भिके तसेच इतरांचा शिष्टमंडळात समावेश होता.
अन्न व औषध प्रशासनाकडून मासळी तपासण्यासाठीची यंत्रणा पूर्णपणे सज्ज होईपर्यंत मासळीच्या आयातीवर बंदी घातली जावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. पणजी, मडगाव, वास्को, फोंडा, मापसा आदी सर्व प्रमुख मासळी बाजारांमध्ये मासळी तपासण्यासाठीची कायमस्वरूपी यंत्रणा उभी करावी. तेथे तंत्रज्ञ नेमावेत अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
आयात मासळी टिकवून ठेवण्यासाठी फॉर्मेलीन रसायनाचा वापर केला जातो हे रसायन मानवी आरोग्यास धोकादायक आहे. गेल्या 12 जुलै रोजी मडगाव येथे घाऊक मासे बाजारात हा प्रकार आढळून आल्यानंतर गोव्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर काही दिवसांसाठी आयात मासळीवर राज्य सरकारने बंदी घातली होती. परंतु ही बंदी उठवण्यात आली असून तपासणी अन्न व औषध प्रशासनाने बंद केली आहे . या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये याबाबत भीतीचे वातावरण कायम आहे. फॉर्मेलीन हे रसायन मानवी पार्थिव टिकवून ठेवण्यासाठी मृतदेहावर लावले जाते. या रसायनाचा वापर मासळी टिकविण्यासाठी केला जात आहे. आणि ते अत्यंत धोकादायक आहे.