पणजी - सीबीआयप्रमुखांना घटनाबाह्य पध्दतीने पदावरुन हटविल्याच्या निषेधार्थ देशव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी शुक्रवारी बांबोळी येथील सीबीआय कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. काही कार्यकर्त्यांनी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांबरोबर त्यांची झटापट झाली. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्यासह सात काँग्रेसी आमदार यावेळी उपस्थित होते.
दुपारी ४.३0 च्या सुमारास बांबोळी येथील सीबीआय कार्यालयासमोर दीडेकशे काँग्रेस कार्यकर्ते जमले व त्यांनी जोरदार घोषणाबाजीही सुरु केली. बंदोबस्तासाठी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. काही कार्यकर्त्यांनी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी त्यांना मागे ढकलले आणि ओढून बाजुला काढले. याप्रसंगी आंदोलक आणि पोलिस यांच्यात काहीवेळ झटापट झाली. परंतु नंतर प्रकरण निवळले.
कवळेकर यांनी यावेळी भाषणात केंद्रात भाजप सरकार स्वायत्त संस्था आपल्या ताब्यात ठेवायला बघत आहे. २0१९ च्या लोकसभा निवडणुकीत या यंत्रणांचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याचे बोलून दाखवले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हुकूमशाही चालवली असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, ‘ अलोक वर्मा यांना सीबीआयप्रमुखपदावरुन बेकायदेशीररित्या हटविण्यात आले. याबाबतीत संसदेतील विरोधी पक्षनेत्याला
विश्वासात घ्यायला हवे होते. रात्री २ वाजता आदेश काढून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. राफेल शस्रास्र घोटाळ्याची चौकशी ते करणार होते त्यामुळेच त्यांना पदावरुन हटविण्यात आले. नागेश्वर राव या नव्या अधिकाºयाची सीबीआयप्रमुखपदी नियुक्ती केली असली तरी राव यांच्यावर गंभीर आरोप आहेत. अशा व्यक्तीला या पदावर का आणले, याबाबत संशय आहे.
दिगंबर कामत, रेजिनाल्द लॉरेन्स, क्लाफासियो डायस, विल्फ्रेड डिसा, नीळकंठ हळर्णकर, फ्रान्सिस सिल्वेरा आदी आमदार तसेच प्रवक्ते अमरनाथ पणजीकर, महिला मोर्चा अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो, युवाध्यक्ष वरद म्हार्दोळकर, एनएसयुआय अध्यक्ष एहराज मुल्ला याप्रसंगी उपस्थित होते.