ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 19 - गोव्यात गाजत असलेल्या किनारा सफाई घोटाळा प्रकरणात कंत्राटदारांना पैसे न फेडण्याचा आदेश कायम ठेवताना लोकायुक्त पी. के. मिश्रा यांनी या प्रकरणी पुढील सुनावणी २ आॅगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. कोट्यवधी रुपयांच्या या कथित घोटाळ्यात कंत्राटदारांना या पुढे पैसे फे डू नये, असा आदेश ६ जुलै रोजी लोकायुक्तांनी दिला होता. पर्यटन संचालक संजीव गांवस देसाई यांनी मंगळवारी हा आदेश मागे घेतला जावा, अशी मागणी करणारा अर्ज सादर केला. तक्रारदार आयरिश रॉड्रिग्स यांनी यास विरोध करताना उलट दोन्ही कंत्राटदारांकडून आतापर्यंत त्यांना पोच झालेले पैसे वसूल केले जावेत, अशी मागणी केली. या कंत्राटदारांनी किनारा सफाईचे काम न करता सरकारी तिजोरी रिकामी केली आहे, असा आरोप त्यांनी केला. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपल्या अहवालात किनारा सफाईच्या कामातील त्रुटींवर बोट ठेवून खरमरीत अहवाल सरकारला सादर केला होता. आयरिश यांनी या अहवालाचा हवाला देताना कंत्राटदार किनाऱ्यांची सफाई योग्य प्रकारे करण्यास असमर्थ ठरले असल्याचा दावा केला. कंत्राटदार राम इंजिनीयरिंग अॅण्ड कन्स्ट्रक्शन्स व भुमिका क्लीन टॅक कंपनीचे मनिष मोहाता यांनी लोकायुक्तांसमोर उपस्थिती लावून उत्तरादाखल प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ मागून घेतली. या कंत्राटात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करताना आयरिश यांनी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, राम इंजिनीयरिंग आणि भूमिका क्लीन टेक या दोन्ही कंपन्यांचे मालक मनिष मोहाता, पर्यटन खात्याचे अधिकारी तसेच माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे बंधू अवधूत यांच्याविरुध्द भादंसंच्या कलम ४२0, १२0 (ब), १९८८च्या भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७, ८, ९, १३ (१) (ड) १३ (२) सह गुन्हे नोंदविण्याची मागणी केली आहे. सप्टेंबर २0१४ साली हे कंत्राट देण्यात आले. उत्तर गोव्यातील किनाऱ्यांच्या साफसफाईचे वार्षिक ७ कोटी ५१ लाख ४0 हजार ९९९ रुपये कामाचे कंत्राट भूमिका क्लीन टेक कंपनीला तर दक्षिण गोव्यातील किनाऱ्यांच्या साफसफाईचे काम राम इंजिनियरिंग या कंपनीला ७ कोटी ४ लाख ८७ हजार ९९९ रुपयांना दिले होते. दोन्ही कंपन्यांचे मालक मनिष मोहता हेच आहेत, असाही आयरिश यांचा दावा आहे. एरव्ही २ कोटी रुपयांमध्ये होणाऱ्या कामासाठी १४ कोटी ५६ लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आल्याचा आरोप आहे.