मडगाव : आतापर्यंत पाच पक्षांची सफर केलेले गोव्याचे माजी पर्यटन मंत्री मिकी पाशेको यांनी आता काँग्रेस पक्षात सामील होण्याची तयारी दाखविली आहे. मात्र त्यासाठी काँग्रेसने आपल्याला पक्षीय कार्यकारिणीवर स्थान द्यावे अशी अटही त्यांनी घातली आहे. 2017 ची निवडणूक गोवा सुराज पार्टी या पक्षाच्यावतीने लढविलेल्या मिकी पाशेको यांना नुवे मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर पाशेको यांनी या पक्षाचाही त्याग केला होता.
मध्यंतरी त्यांनी युनायटेड गोवन्स डेमोक्रेटिक पार्टी या पक्षात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्या या प्रयत्नांना यश आले नव्हते. त्यामुळे सध्या राजकीयदृष्टय़ा बेकार असलेले मिकी कुठल्यातरी एका राजकीय पक्षाच्या शोधात आहेत. शुक्रवारी सीबीआयने दाखल केलेल्या मनी लाँडरींग प्रकरणातून मुक्त झालेल्या पाशेको यांनी, जर काँग्रेस पक्ष मला कोणतेही पद देण्यास तयार असल्यास मी या पक्षात सामील होण्यास तयार आहे. या पक्षाचा खर्चही सोसण्याची माझी तयार आहे असे ते म्हणाले.
अत्यंत वादग्रस्त राजकारणी म्हणून परिचित असलेले मिकी पाशेको यांनी आपली राजकीय कारकिर्द राष्ट्रवादी पक्षातून सुरु केली होती. मात्र 2008 साली या पक्षाचा त्याग करुन त्यांनी युनायटेड गोवन्स डेमोक्रेटीक पार्टी या पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवून बाणावली मतदारसंघातून विजय मिळविला होता. मात्र चार वर्षातच त्यांनी युगोडेपाला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला. मात्र त्यांचा हा भाजपा प्रवेश 24 तासही टीकला नाही.
दुस-याच दिवशी ते पुन्हा राष्ट्रवादी पक्षात सामील होऊन बाणावलीतून दुस-यांदा निवडणूक जिंकली होती. 2012 साली राष्ट्रवादीला रामराम करत त्यांनी गोवा विकास पार्टी हा स्थानिक पक्ष पुनर्जिवीत करत नुवे मतदारसंघातून निवडणूक लढवित विजय मिळविला होता. मात्र 2017 साली त्यांनी याही पक्षाचा त्याग करुन गोवा सुराज पार्टी या पक्षाला आलिंगन दिले होते. आता त्याही पक्षातून बाहेर पडल्याने पाशेको सध्या कुठल्याही राजकीय पक्षात नाहीत.
पाशेको यांना पुन्हा एकदा आपली राजकीय इनिंग बाणावली मतदारसंघातुन सुरु करायची आहे. यासंबंधी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सध्याचे भाजपप्रणित सरकार लोकविरोधी असून ते लवकरात लवकर सत्ताभ्रष्ट होण्याची गरज आहे. याच सरकारातील काही मंत्र्यांनी यापूर्वी माझा छळ केला होता. पण पाशेको यांनी पुढची निवडणूक बाणावलीतून लढविण्याचे संकेत दिले असतानाच आपल्या नुवे मतदारसंघातून त्यांनी आपली पत्नी व्हियोला पाशेको यांना राजकीय रिेंगणात उतरविण्याची तयारी चालविली आहे.