मडगाव - बनावट सोने तारण ठेवून बँकेतून कर्ज घेऊन बँक ऑफ इंडियाला लुबाडण्याचे सहावे प्रकरण उघडकीस आले आहे. कुंकळ्ळी, नावेली, उतोर्डा या बँक ऑफ इंडियाच्या शाखांप्रमाणेच कुडचडेच्या शाखेतूनही बनावट सोने तारण ठेवून 11.39 लाखांचे कर्ज काढल्याचे प्रकरण पुढे आले आहे. कुडचडे पोलीस स्थानकाचे निरीक्षक रवींद्र देसाई यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या प्रकरणात बँकेचा व्हेल्युएटर असलेल्या शाणू लोटलीकर या सोनाराला अटक केली असून कर्ज घेतलेल्या कल्याणी परवार (बाणसाय-कुडचडे) आणि सरोज शेट्टी (गणोमरड-शेल्डे) या दोन महिलांनी आपल्याला अटक होणार या भीतीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.
परवार हिने खोटे सोने तारण ठेवून सात लाखांचे कर्ज कुडचडेच्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून घेतले होते तर शेट्टी या महिलेने 4.39 लाखांचे कर्ज घेतले होते. हे दोन्ही कर्ज घेताना लोटलीकर याने तारण ठेवलेले दागिने ख:या सोन्याचे असल्याचा अहवाल बँकेला दिला होता. आतापर्यंत बँक ऑफ इंडियाच्या कुंकळ्ळी परिसरातील शाखांतून अशाप्रकारच्या तीन घटना उघडकीस आल्या असून उतोर्डा व नावेली या शाखेतून प्रत्येकी एक प्रकार घडला आहे. या सर्व प्रकरणात शाणू लोटलीकर या संशयिताचा हात असून आतार्पयत चार पोलीस स्थानकात त्याच्या विरोधात एकूण सहा गुन्हे नोंद झाले आहेत.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर बँक ऑफ इंडियाने आपल्या इतर व्हेल्युएटरांच्या पार्श्वभूमीचीही चौकशी सुरू केली आहे. यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी सोन्याचा दर्जा तपासणारे ‘कॅरेट चेकींग’ मशीन प्रत्येक शाखेत बसवण्याचा निर्णय घेतला आहे.