ऑनलाइन लोकमतपणजी, दि. १५ - बनावट सह्या करून डिसी बँकेतून ३.१३ कोटींची अफरातफर करणाऱ्याच्या आरोपाखाली गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चेतन देसाई, सचिव विनोद फडके आणि खजिनदार अकबर मुल्ला यांना आर्थिक गुन्हे विभागाने अटक केली. या घटनेमुळे गोव्याच्या क्रिकेट वर्तुुळात मात्र प्रचंड हादरा बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणाची चौकशी सुरू होती. माजी रणजीपटू हेमंत आंगले यांनी सर्वाेच्च न्यायालयात कथित व्यवहाराप्रकरणी याचिका दाखल केली होती. त्यामुळे जीसीए पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. बनावट सह्या करून २००७मध्ये पणजी येथील डेव्हलपमेंट क्रेडिट बँकेत (डीसीबी बँक) खाते उघडून बीसीसीआयने दिलेला २.८७ कोटींचा चेक भरणा केला आणि सोयीनुसार रक्कम काढली, असा खुलासा विद्यमान अध्यक्ष देसाई, सचिव विनोद फडके यांनी केला होता.
एवढेच नव्हे, तर या व्यवहाराशी आपला कसलाही संबंध नसल्याचे म्हटले होते. मात्र या प्रकरणात या त्रिकुटाचा हात असल्याच्या आरोपावरून आर्थिक गुन्हे विभागाने त्यांच्यावर ही कारवाई केली आहे.