म्हापसा : गोव्यात कस्टम अधीक्षक पदावर असलेले विवेकानंद उर्फ विवेक गोविंद नाईक (वय 54 वर्ष ) या अधिका-याने आपल्या राहत्या घरापासून 100 मीटरच्या अंतरावर गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचा प्रकार गुरुवारी (16 नोव्हेंबर) सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास उजेडात आला. त्यानंतर लगेच म्हापसा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
सदर परिसर म्हापसा पोलीस स्थानकाच्या मागे असून जुनाट तसेच पडण्याच्या मार्गावर असलेल्या घराच्या पडवीत दोरीच्या मदतीने आत्महत्या केली. त्या घरातील मुख्य गेटचा दरवाजाला टाळे असल्याने कुंपणावरुन उडी घेऊन त्यांनी आत प्रवेश केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरणीय तपासणीसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे. बुधवारी रात्री उशीरापर्यंत अनेक लोकांनी सदर परिसरात त्याला पाहिल्याचे तेथे जमलेले लोक बोलत होते.
मृत विवेक नाईक हा वास्को येथील दाबोळी विमानतळावरील कस्टमच्या गुप्तचर विभागात सध्या सेवेला होता. बुधवारी रात्री त्याला ड्युटी होती, पण आपण ड्युटीवर येऊ शकत नसल्याने त्यांनी कस्टम आयुक्तांना फोनवरुन कळवलं होते, अशी माहिती घटनास्थळी दाखल झालेले सहाय्यक आयुक्त महेश देसाई यांनी दिली. तो कार्यक्षम अधिकारी होता असेही त्यांनी सांगितले.
पंचनामा करतेवेळी पोलिसांना त्याच्या खिशात चार चिठ्ठ्या आढळून आल्या. त्यातील एक पत्नीच्या नावे, दुसरी भावाच्या, तिसरी बहिणीच्या तर चौथी कस्टम आयुक्तांच्या नावे लिहिली असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सेराफीन डायस यांनी दिली. त्यामुळे त्याच्या आत्महत्येचा प्रकार घातपात असण्याची शक्यता डायस यांनी तुर्तात नाकारली आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून चौकशी अंती कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगितले. सापडलेल्या चिठ्ठीत त्यांनी आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे.
विवेक हा एक उत्कृष्ठ क्रीडापटू होता. १९ वर्षाखालील गोव्याच्या क्रिकेट संघाचे त्यांनी प्रतिनिधीत्व सुद्धा केले आहे. तसेच राज्य स्तरावरील अनेक स्पर्धातून लक्षवेधी कामगिरीसुद्धा त्यांनी केली आहे. क्रिकेट बरोबर त्यांनी इतर खेळातूनही नाव कमावले होते.