मडगाव : शिवजयंतीच्या पूर्वी आणि शिवजयंतीच्या दिवशी सां जुझे आरियल गावात घडलेल्या घटनांची सखोल चौकशी करावी, गावाबाहेरून आलेल्या व तणाव निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाव्दारे केली. सां जुझे आरियलच्या ग्रामस्थांनी गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारल्याप्रश्नी काल, २५ फेब्रुवारी रोजी खास ग्रामसभा घ्यावी अशी मागणी केली होती. परंतु गट विकास अधिकाऱ्यांनी परवानगी दिली नाही. त्यामुळे ग्रामसभा झाली नाही. आता ही ग्रामसभा ३ मार्च होजी होणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, १९ फेब्रुवारी रोजी गावाबाहेरील लोकांनी येऊन जो बेकायदा जमाव जमवला. मंत्र्यांच्या उपस्थितीत गावात तणाव निर्माण केला, त्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी असे पंचायतीला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. ग्रामसभा घेण्यासाठी गट विकास अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. परंतु त्यांनी दोन दिवसांपूर्वी पत्र पाठवून खास ग्रामसभा घेण्याची परवानगी पंचायतीला देण्यात नकार दिल्याचे पंचायतीला कळविण्यात आले.
गावातील लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु गावाबाहेरून आलेल्यांवर गुन्हे का दाखल केलेले नाही, अशी विचारणा करत ग्रामस्थांनी पंचायतीला हे निवेदन दिले आहे. गुन्हे नोंद करताना बेकायदा जमाव जमवल्याचे कारण देण्यात आले आहे. मात्र गावातील लोक हे येथे होणाऱ्या बेकायदा कामाला विरोध करण्यासाठी एकत्र आले होते. गावा बाहेरून येऊन ज्या लोकांनी बेकायदेशीर कामे केली, त्यांच्यावर कारवाई का केली नाही? असा प्रश्न ग्रामस्थानी उपस्थित केला आहे.
प्रशासनाने केवळ सां जुझे आरियल गावातील लोकांवर गुन्हे दाखल करून कारवाई केली. बाहेरील लोकांनी गावात येऊन तणावाचे वातावरण निर्माण केले. प्रशासनाने गावातील लोकांवर गुन्हे दाखल केले त्यामुळे पंचायतीने गावातील लोकांचे प्रश्न मांडावेत अशी मागणी पंच जॉयसी फर्नांडिस यांनी केली आहे.