पणजी : गोवा विधानसभेचे उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांच्याकडे पोर्तुगीज नागरिकत्त्व असल्याचे कथित प्रकरण अखेर कोर्टात पोचले आहे. समाज कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांनी येथील प्रथम श्रेणी न्यायालयात यासबंधीची याचिका सादर करताना तक्रार करुनही पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नसल्याचे निदर्शनास आणले आहे. आयरिश यांनी गेल्या ४ रोजी इजिदोरांविरुद्ध शहर पोलिसात तक्रार केली होती. १९५५ च्या नागरिकत्त्व कायद्यानुसार तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम १७७, १८१, ४१९ व ४२0 नुसार आणि लोकप्रतिनिधी कायद्यानुसार इजिदोर यांच्याविरुध्द गुन्हे नोंदविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आयरिश यांनी या याचिकेत कोर्टाकडे केली आहे.
इजिदोर हे राजकीय नेते असल्याने कोर्टाने चौकशीच्या कामावर निगराणी ठेवावी, अशी विनंतीही याचिकादाराने केली आहे. इजिदोर यांच्याकडे पोर्तुगीज नागरिकत्त्व आहे आणि त्यांनी २२ एप्रिल २0१४ रोजी पोर्तुगालमधील बेजा येथील सिव्हिल रजिस्ट्रेशन कार्यालयात जन्मनोंदणी केली आहे. त्यामुळे ते घटनात्मक पद भूषवू शकत नाहीत. आमदार तसेच उपसभापती म्हणून ते आर्थिक लाभ घेत आहेत तसेच त्यांनी याआधी आमदारकीची पेन्शनही घेतली आहे. मतदाररयादीत आपले नाव रहावे म्हणून पोर्तुगीज नागरिकत्त्वाबद्दल गुप्तता पाळली, असा आरोपही आयरिश यांनी केला आहे.