पणजी - गोव्यात प्रचंड वेगाने राजकीय हालचाली घडत आहेत. उपमुख्यमंत्रीपद भुषविणाऱ्या सुदिन ढवळीकर यांना बुधवारी (27 मार्च) मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे. लोक आणि काळ काय ते ठरवील अशी प्रतिक्रिया महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे (मगो) अध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी व्यक्त केली आहे.
मगो पक्ष भाजपाप्रणीत आघाडीचे सरकार पाडू पाहत होता व त्यामुळे आम्ही मगो पक्ष सोडला, असे मंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांनी येथे जाहीर केले आहे. मगो पक्षाकडे एकूण तीन आमदार होते. त्यापैकी आजगावकर आणि सावर्डे मतदारसंघाचे आमदार दिपक प्रभू पाऊसकर हे मगो पक्षापासून वेगळे झाले. त्यांनी भाजपामध्ये आपला गट विलीन केला आहे. भाजपाने मगोपच्या पूर्ण विधिमंडळ गटाचे भाजपामध्ये विलीनीकरण झाले अशी भूमिका घेतली आहे. आम्ही मगोप सोडून जाणार नव्हतो पण आम्हाला आमच्या अस्तित्वासाठी भाजपामध्ये जावे लागले. आम्ही आनंदाने भाजपामध्ये गेलो पण मगो पक्ष सरकार पाडू पाहत होता असे दिपक पाऊसकर म्हणाले आहेत.
मगोपकडे आता एकमेव आमदार सुदिन ढवळीकर हे राहिलेले आहेत. सुदिन ढवळीकर हे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाईल व दिपक प्रभू पाऊसकर यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल अशी चर्चा मंगळवारी (26 मार्च) रात्री सुरू झाली होती. बुधवारी सकाळी ही चर्चा खरी ठरली आहे. राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा या पाटणा-बिहार येथे गेल्या आहेत. त्या खास विमानाने गोव्यात परततील. त्या आल्यानंतर दिपक पाऊसकर यांचा मंत्री म्हणून शपथविधी केला जाईल.
सुदिन ढवळीकर यांना लोकमतने प्रतिक्रिया विचारली असता, ते म्हणाले की लुईङिान फालेरो सरकार अधिकारावर असतानाही अशाच प्रकारे मगोपचे दोन आमदार रमाकांत खलप व प्रकाश वेळीप फुटले होते. ते पुन्हा निवडून आले नाहीत. तसेच 'मी मगो पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे मगोपचे अस्तित्व निश्चितच कायम राहते' असं ढवळीकर यांनी म्हटलं आहे.